बार्शी शहर परिसरात सलग तिसऱ्या दिवशीही जोरदार  पाऊस 

बार्शी : 

बार्शी शहर व तालुक्यात विविध ठिकाणी तीन दिवसांपासून मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत असून रविवारीही तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. यामुळे काही ठिकाणी ओढे, नाले वाहू लागले आहेत.

दरम्यान, पावसाने वाफसा मोडल्याने रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. खरिपाच्या तूर आदी पिकासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार असला तरी काढणीस आलेल्या सोयाबीन आदी पिकांसाठी तसेच नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकासाठी हा पाऊस नुकसानकारक ही ठरू शकतो. 

उत्तरा, हस्त नक्षत्राने शहर व तालुक्याच्या विविध भागात बऱ्यापैकी हजेरी लावली. त्यानंतर शुक्रवार दि ११ पासून चित्रा नक्षत्राची सुरुवात झाली. या नक्षत्रातही सुरुवातीपासूनच पावसाने चांगली हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. या आठवड्याच्या सुरूवातीला कांहीशी उघडीप दिल्यानंतर शुक्रवार पासून पुन्हा पावसाने तालुक्याच्या विविध भागात जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. रविवारी दि २० रोजी दिवसभर अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसात होत्या. सायंकाळच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्रीही सुरू होता. दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसाने जलयुक्त शिवार अभियान व पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध गावात झालेल्या कंपार्टमेंट बंडीग कामे, नदी, नाले ओढे आदी ठिकाणी पाणी साचले आहे.

या पावसामुळे रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तसेच ज्यांनी पेरण्या केल्या आहेत त्यांची पिके उगवून येण्यास देखील या पावसामुळे अडचण होणार आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: