माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सरसंघचालक मोहन भागवतांनीही बजावला मतदानाचा हक्क

मुंबई | महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाच्या सुरुवातीलाच सरसंघचालक मोहन भागवत आणि राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वात पहिले मतदानाचा हक्क बजावला. मोहन भागवत यांनी नागपूरमधल्या मतदान केंद्रावर मतदान केले. तर अजित पवार यांनी काटेवाडीतील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाला हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारही यांनीही मतदान केलं.

सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार सुरू राहणार आहे. तर गडचिरोलीसारख्या संवेदनशील मतदान केंद्रांवर दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. मतदानकेंद्रांवर मोठी लगबग सुरु आहे. तसेच राज्यभरातील मतदानावर पावसाचे सावट असल्यामुळे सर्व तयारी करण्यात आली आहे. जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.

विधानसभा निवडणुकांसाठी दिव्यांगांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. दरम्यान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव दल, गुजरात राज्य राखीव दलाचाही बंदोबस्तही आहे. दुर्गम भागासाठी वायरलेस सेट तसेच संवेदनशील केंद्राच्या टेहाळणीसाठी ड्रोनचाही वापर करण्यात येतोय. यासोबतच गुगल मॅपमध्ये सर्व मतदान केंद्रे टॅग केल्याने मतदान केंद्र नेमके कुठे आहे, किती जवळ किंवा लांब आहे हे मतदारांना घर बसल्या समजू शकणार आहे.

एकूण विधानसभा मतदारसंघ – 288 
महाराष्ट्रातील एकूण मतदार –  8, 97, 22, 019
एकूण मतदान केंद्रे – 96,661 

एकूण उमेदवारांची संख्या – 3,237 
महिला उमेदवारांची संख्या – 235
पुरुष उमेदवारांची संख्या – 3001 
तृतीयपंथी उमेदवारांची संख्या – 01

ग्लोबल न्युज नेटवर्क: