नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत व्यापले राज्य…

पुणे । मान्सून आता संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. वायू चक्रीवादळामुळे तब्बल 15 दिवस उशिराने मान्सून दाखल झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. 20 जून रोजी मान्सूनने तळकोकणात धडक दिली आणि नंतर पुढच्या पाचच दिवसांत संपूर्ण महाराष्टात मान्सून सक्रिय झाला. पुढील दोन दिवस मान्सून आपला पहिला टप्पा पूर्ण करणार असून यानंतर थोडीशी उसंत घेण्याची शक्यता आहे. यानंतर पुन्हा राज्यभर जोरदार पाऊस पडणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तवले आहे.

मान्सून इन मुंबई

मुंबईकरांना प्रतीक्षा असलेला मान्सून अखेर दाखल झाला आहे. राज्यातील इतर ठिकाणी मान्सून सक्रिय झाल्यानंतर मुंबईकरांना मात्र मान्सूनची प्रतीक्षा होती. परंतु आता मुंबईकरांची मान्सूनची प्रतीक्षा संपली असून मुंबईत मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. पुढील काही दिवसांमध्ये मुंबईत जोरदार पावसाची शक्यतादेखील वर्तवण्यात येत आहे.

केरळमध्ये 7 जून रोजी दाखल झालेला मान्सून वायू चक्रीवादळामुळे राज्यात उशिरानं दाखल झाला. परंतु दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसानं हजेरी लावली. राज्यात भीषण दुष्काळ असून पावसामुळे अनेक भागांना दिलासा मिळाला आहे. मुंबईतील काही भागांमध्येही पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत.

कोकणात देखील पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये शेतीच्या कामांना जोर चढला आहे. लोकांनी पेरण्या देखील केल्या आहे. 7 जून ही मान्सून दाखल होण्याची तारीख पण, वायू चक्रीवादळाचा परिणाम हा मान्सूनच्या गतीवर झाला. त्यामुळे 1972 नंतर प्रथमच जवळपास 8 ते 10 दिवस उशिरानं पाऊस कोकणात दाखल झाला. मान्सून आता मुंबईत दाखल झाल्यानं राज्याचा सर्व भाग मान्सूननं व्यापून गेला आहे.

admin: