बार्शी तालुक्यातील कोंढारे कुटुंबाने अस्थी विसर्जनाच्या प्रथेला दिला फाटा, अन वाचा काय केले ते

बार्शी : समाजामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक प्रथा-परंपरा ,विधी चालत आल्या आहेत. मात्र काळानुसार त्यामध्ये हळूहळू बदल होताना दिसत आहेत.


मनुष्य जिवनातील अंतिम टप्पा असलेल्या अंत्यविधी व त्यानंतर तिस-या दिवशीच्या (सावडणे)अस्थी विसर्जनाच्या प्रचलित रूढी परंपरेला छेद देत तालुक्यातील चिखर्डे येथील कोंढारे कुटुंबियांनी घरातील प्रमुखांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी संगमावर जाऊन नदीत विसर्जन न करता ज्या शेतात आयुष्यभर जिथे काबाड कष्ट केले त्या शेतात खड्डा घेऊन त्या खड्डयात अस्थी टाकून तेथे आंब्याचे वृक्षारोपण केले.

याबाबत अधिक माहिती अशी की चिखर्डे गावातील प्रभाकर प्रल्हाद कोंढारे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचा अंत्यविधीही पार पडला.त्यानंतर तिस-या सावडण्याच्या दिवशी कोंढारे यांचे जावई अॅड. महेश जगताप व मुलगा भरत कोंढारे, त्यांचे भाऊ शंकर कोंढारे,नानासाहेब कोंढारे, पोलिस निरीक्षक जयंत गादेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटिल ,संजय कोंढारे ,विजय कोंढारे ,तंटामुक्ती अध्यक्ष नाना कोंढारे, आदींनी पुढाकार घेऊन अस्थी विसर्जन हे प्रचलित पद्धतीने न करण्याचा निर्णय घेतला.


कोंढारे यांच्या अस्थी शेतात घेऊन जाऊन तेथे खड्डा घेऊन सर्वांच्या साक्षीने आंबा या झाडाचे वृक्षारोपन केले.
चिखर्डे येथील कोंढारे परिवाराने समाजाला घालुन दिलेल्या  आदर्श उपक्रमाचे अनुकरण समाजाने करणे खरोखरच काळाची गरज निर्माण झाली आहे.ज्या ठिकाणी खड्डा घेऊन त्या खड्डयात आपल्या वडिलांची रक्षा आहे व जिथे आंब्याचे रोपटे लावले असेल त्या  रोपट्याची चांगल्या पद्धतीने काळजी घेऊन ते रोपटे काळजीपूर्वक जतन केले जाऊ शकते.

प्रचलित पद्धतीत अस्थी ही नदी अथवा पाण्याच्या ठिकाणी विसर्जित केली जाते.सावडण्याच्या तिस-या दिवशी पै पाहुणे व नातेवाईक मिळुन आपल्या वाहनातुन पवित्र तिर्थक्षेत्र अथवा नद्यांचा संगम असलेल्या नदीवर जाऊन बंदी असतानाही अस्थीची पोती नदीपात्रात विसर्जित करतात.मात्र त्यामुळे नदी व जल प्रदुषण होऊन पाणी दुषित होते.पुढे तेच पाणी जनावरे पितात,तिर्थक्षेत्री त्याच पाण्यात अंघोळ केली जाते.


मात्र कोंढारे परिवाराच्या उपक्रमांचा अवलंब केल्यास जल व नदी प्रदुषणाचा प्रश्नच न उद्भवता शेतात आपल्या नातलगाची आठवण ठेऊ शकतो.

ग्लोबल न्युज नेटवर्क: