नाथसागर (जायकवाडी)ची ‘तुडुंब’ भरण्याकडे वाटचाल, 90 हजार क्युसेक्सचा ओघ

ग्लोबल न्यूज नेटवर्क: औरंगाबाद जालना जिल्ह्यासह मराठवाड्यासाठी महत्वाचे असलेल्या नाथसागर( जायकवाडी) जलाशयाची ‘तुडुंब’ भरण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. रात्री 9 वाजता प्रतिसेकंदाला 90 हजार क्युसेक्सचा जलौघ जायकवाडीत येत होता. नागमठाण प्रकल्पातून येणाऱ्या या पाण्यासोबत आता उद्यापासून नांदुर-मधमेश्वर बंधाऱ्यातून सुटलेला तब्बल अडीच लाख क्युसेक्सचा महाजलौघ सामील होणार आहे. त्यामुळे रविवारी रात्री 20 टक्के असलेला पाणीसाठा झपाट्याने वाढणार आहे. गेल्या दोन वर्षात हे धरण भरले नव्हते. नाथसागर जलाशयात दर तासाला पाणीवाढ होत असून सध्या प्रतिसेकंद तब्बल 87 हजार 416 क्युसेक्स याप्रमाणे नवीन जलौघ दाखल होतच आहे. जायकवाड़ी धरणातील ऊपयुक्त जलसाठा आता 20 टक्के झाला आहे. जायकवाड़ी धरणाची पाणी पातळी रात्री 9 वाजता 1502 फुट नोंदवली गेली. धरणाची एकुण जलसाठवण क्षमता 1522 फुट असून प्रकल्प काठोकाठ भरण्यासाठी 20 फुट पाणीपातळीची गरज आहे. गेल्या 5 दिवसात पाणीपातळी 9 फुटांनी वाढली आहे. वरच्या भागातील धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असून नाशिक परिसरात पाऊस कोसळतच आहे. परिणामी नाथसागर जलाशयात सध्या 87 हजार 416 क्युसेक्स पाण्याची आवक चालू आहे. 1 जून पासून एकूण 591.344 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आलेला आहे. यापैकी 355.785 दलघमी एवढे पाणी वापरायोग्य आहे, अशी माहिती जलसंपदा सुत्रांनी दिली. दरम्यान, ऊणे11 टक्के अशी दयनीय पाणीस्थीती झाल्यानंतर या 5 दिवसाच्या काळात एकुण 30 टक्के पाणी नाथसागरात आलेले आहे. मृत साठ्यातील टक्केवारी वजा जाता आजमितीस 20 टक्के पाणी जिवंत साठा अर्थात वापरायोग्य जलसाठा आहे. नांदुर-मधमेश्वर मधून अडीच लाख क्युसेक्सचा महाजलौघ जायकवाडीकडे झेपावला ! दरम्यान, गोदावरी नदीच्या वर असलेल्या धरणांतून केल्या जाणाऱ्या विसर्गात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. आज दुपारी 4 नंतर विसर्ग वाढायला सुरुवात झाली आहे. वरच्या बाजूला अनेक धरणे असली तरी ‘नागमठाण’ प्रकल्पातून येणारे पाणी हे थेट जायकवाडीत येते. त्यामुळे जलसंपदा प्रशासनातर्फे नागमठाण येथून येणाऱ्या जलौघाचे मोजमाप जाहीर करुन आगामी जलनियोजन केले जाते. रात्री नागमठाण धरणातून 90 हजार क्युसेक्सचा जलौघ सुरू असतानाच आता नांदुर मधमेश्वर (निफाड, जिल्हा नाशिक) बंधाऱ्यातूनही तब्बल 2 लाख 62 हजार क्युसेक्स एवढा महाकाय पाणपसारा गोदावरी नदीच्या मार्गे नाथसागराकडे झेपावला आहे. तथापि 18 तासानंतर हे पाणी जायकवाडीत दाखल होणार आहे. ऊद्या दुपारनंतर अक्षरशः लाखो क्युसेक्सचा पाणीसाठा नाथसागर जलाशयात येणार असल्याने यंदा हा महत्वाकांक्षी प्रकल्प पुर्णक्षमतेने भरणार असल्याची सुखद शक्यता व्यक्त केली जात आहे

ग्लोबल न्युज नेटवर्क: