तुम्हाला माहीत आहे का,पाऊस कसा पडतो ?

तुम्हाला माहीत आहे का,पाऊस कसा पडतो ?

पाऊस आपल्याला हवाहवासाही वाटतो आणि नकोनकोसाही वाटतो. वैशाखवणव्यापायी धरती सुकून गेलेली असली, पावसाविना डोळ्यांना पाणी येऊ लागलं की आपण ‘येरे येरे पावसा’ अशी त्याची आळवणी करतो. आणि तोच पाऊस रुद्रावतार धारण करत आला की नको नको रे पावसा, असा धिंगाणा म्हणून त्याला दटावतोही.

जगाच्या पाठीवर आपल्या उपखंडांसारखे इतरही काही प्रदेश आहेत की जिथलं सारं जीवनचक्र, सारं अर्थकारण पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलं तरी तो वर्षभरातून तीन चार महिनेच आपली हजेरी लावून जातो. उलट काही प्रदेशांत वर्षभर त्याची उपस्थिती असते. त्यामुळं पाऊस केव्हा पडणार आहे, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं असतं.

धरतीवर असलेलं एकूण पाणी कायम असतं. त्यात वाढही होत नाही की घटही होत नाही. पण त्याचं सतत अवस्थांतर सुरू असतं. समुद्र तसंच नद्या नाले यांच्यामधलं पाणी प्रदूषित झालेलं असतं. सूर्याच्या उष्णतेनं त्याची वाफ होते. तापलेल्या पाण्याच्या जवळ असलेली हवाही तापते. तापलेली हवा आणि वाफ हलकी असल्यामुळे ती आकाशात वरवर जाते. वर गेल्यावर तिथलं तापमान थंड असतं. त्यामुळे त्या वाफेचं पाण्याच्या छोट्या छोट्या थेंबामध्ये अवस्थांतर होतं. हे थेंब हवेत तरंगत राहतात.

वाफ आणि हे जलबिंदू मिळून ढग तयार होतात. वाऱ्याने हे ढग इकडेतिकडे फिरत राहतात. त्यांना थंड हवा लागली की त्यातल्या आणखी वाफेचे जलबिंदूंमध्ये अवस्थांतर होते. हे जलबिंदूही वेडेवाकडे फिरत असतात. एकमेकांवर आपटतात. त्यातले काही एकत्र येऊन त्यांचं आकारमान वाढतं. असे ते मोठे आणि जड झाले की तरंगू शकत नाहीत. जमिनीच्या दिशेने झेपावतात. वारे त्यातल्या काही बिंदूंना परत वरच्या दिशेने ढगांमध्ये ढकलतात.

ही चढाओढ चालू राहत ते जलबिंदू आणखी मोठे होतात. आता ते हवेत तरंगू शकत नाहीत. जमिनीकडे खेचले जातात. पाऊस पडतो. हे पावसाचं पाणी शुद्ध झालेलं असतं. त्यातले प्रदूषण नाहीसे झालेले असतात. परत एकदा शुद्ध आणि गोड्या पाण्याचे साठे पूर्ववत होतात. असं हे जलचक्र अव्याहत चालूच असतं.

उत्तर गोलार्धात विषुववृत्ताच्या जवळपास असणारा प्रदेश जास्त तापमानाचा असतो. जसजसं अधिकाधिक उत्तरेला जावं तसतसं तापमान घसरत जातं. त्यामुळे दक्षिणेकडून उबदार हवेचे झोत उत्तरेकडे आणि उत्तरेकडून थंड हवेचे झोत दक्षिणेकडे प्रवास करत असतात.

त्यांच्या तापमानांमध्ये लक्षणीय फरक असल्यामुळे जिथं ते दोन एकमेकांना भिडतात तिथं ते एकमेकांमध्ये मिसळू शकत नाहीत. त्यांच्या सीमेवर फ्रंटल सिस्टम तयार होते. पुढे पुढे सरकत राहते. गरम हवा हलकी असल्यामुळे तिला पुढे पुढे येऊ पाहणाऱ्या थंड हवेच्या झोतावर चढावं लागतं. तसं झालं की ती थंड होते. तिच्यातल्या वाफेचं पाण्यात अवस्थांतर होऊन पाऊस पडतो.

संकलन
अनिल देशपांडे बार्शी

साभार
बाळ फोंडके यांच्या ‘केव्हा ?” या पुस्तकातून

ग्लोबल न्युज नेटवर्क: