कोकण, पश्चिम व दक्षिण महाराष्टात दमदार पाऊस, धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

पुणे : कोकणासह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि  पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रातील धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोकणातील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तर पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, नगरमधील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन ती ही लवकरच भरतील असे दिसत आहे.जोरदार पावसाअभावी मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश धरणे अद्यापही तळाशी असल्याचे चित्र आहे.सोलापूर जिल्ह्यातील उजनी वगळता इतर प्रकल्प ही अद्याप कोरडेच आहेत.

भीमा खोऱ्यातील खडकवासला, कळमोडी, आंद्रा (सर्व पुणे जिल्हा) ही धरणे १०० टक्के भरली आहेत. भीमा नदीच्या खोऱ्यातील धरणांचा विचार करता कुकडी नदीच्या खोऱ्यातील धरणांमध्ये अद्यापही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. तर चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, पवना, कासारसाई, मुळशी, पानशेत, गुंजवणी, भाटघर, वीर, निरा देवघर धरणांमधे ६० टक्क्यांपेक्ष अधिक पाणीसाठा झाला आहे. खडकवासला, कळमोडी, आंद्रा, वडीवळे, वडज, चासकमान कासारसाई धरणांचा सांडवा किंवा कालव्यातून पाणी साडण्यात येत आहे. दौंडजवळ भीमा नदीपात्रातून सुमारे ९० हजार क्युसेक वेगाने पाणी उजनीत जमा होत असल्याने लवकरच अचल पातळीतील पाणीसाठा चल पातळीत येणार आहे.

कृष्णा नदीच्या खोऱ्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर अधिक, त्यामुळे बहुतांशी धरणांमध्ये ६० ते ८० टक्के पाणीसाठा झाला आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील मुक्त पाणलोटातील पावसामुळे नद्यांना पूर आले आहेत. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने २७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोयना धरणातही जवळपास ६० टक्के पाणीसाठा आहे. तर राधानगरी, कासारी, तारळी धरणाच्या कालव्यातून आणि नदीपात्रातून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कराडच्या कृष्णा पुलाजवळ नदीपात्रात २२ हजार, सांगलीच्या आयर्विन पुलाजवळ ३३ हजार तर कोल्हापूरच्या राजाराम बंधाऱ्याजवळ नदीपात्रात ३३ हजार क्युसेक वेगाने पाणी वाहत होते.

गोदावरी आणि तापी खोऱ्यात अनेक धरणांत पाणी साठा वाढू लागला आहे. नाशिक आणि नगरमधून गोदावरीला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रातही पावसाने कमी अधिक हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यातील कडवा, भाम, भावली, दारणा, गंगापुर धरणात ८० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. तर दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण निम्मे भरले असले तरी निळवंडे, मुळा, मुसळवाडी तलाव आदी मोठ्या प्रकल्पांमध्ये अद्याप पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. दारणा धरणातून सोडलेले पाणी आणि गोदावरीच्या उपनद्यांच्या खोऱ्यात झालेल्या पावसामुळे गोदावरीला पाणी आले असून, जायकवाडी धरणाचा पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. तापी खोऱ्यातील हातनूरच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. मात्र हातनूर, वाघूर, गिरणा धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. 
मराठवाड्यातील सर्वच धरणे अद्यापही रिकामीच आहेत. जायकवाडीसह बीड जिल्ह्यातील मांजरा, माजलगाव, हिंगोलीतील येलदरी, सिद्धेश्वर, उस्मानाबाद मधील निम्न तेरणा, सिना कोळेगाव, परभणीतील निम्न दुधना ही सर्व धरणे अद्यापही अचल पातळीतच आहेत. नगर नाशिकमधील धरणे भरल्यानंतर जायकवाडीचा पाणीसाठा वाढणार आहे. तर इतर धरणे भरण्यासाठी मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणे आवश्यक आहे. 

विदर्भात यंदाही पावसाने दमदार बरसात न केल्याने धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. अकोल्यातील काटेपूर्णा, वाण, अमरावतीतील ऊर्ध्व वर्धा, बुलडाण्यातील नळगंगा, खडकपूर्णा, पेनटाकळी, यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा, इसापूर, अरुणावती, पूस धरणात २० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर अनेक धरणे अद्यापही तळाशी आहेत. भंडाऱ्यातील गोसी खुर्द, बावनथडी, गडचिरोलीतील दिना, नागपुरातील खिंडसी, तोतलाडोह वर्धातील निम्न वर्धा, बोर, गोंदियातील पुजारी टोला, कालीसरार हे प्रकल्प अद्यापही मृत पातळीत असल्यासारखेच आहेत. इतरही धरणांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालावरून दिसून येत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: