एका सर्व्हेनुसार सेना-भाजप स्वतंत्र लढल्यास ही भाजपला स्पष्ट बहुमत; भाजपच्या गुप्त सर्व्हेचा रिपोर्ट

मुंबई : लोकसभा निवडणुकीत देशभरात भाजपला घवघवीत यश मिळालं. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीने विरोधकांचा धुव्वा उडवला. पण आता राज्यात होऊ  घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये  मुख्यमंत्री पदाबाबत अंतर्गत स्पर्धा सुरू असल्याचं दिसत आहे. अशातच आता निवडणुकीसाठीचा भाजपचा सर्व्हे समोर आला आहे.यामध्ये भाजप स्वबळावर लढला तरी देखील स्पष्ट बहुमताने राज्याची सत्ता जिंकेल असे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजप सेना युती होणार की याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

शिवसेनेकडून युवा नेते आदित्य ठाकरे यांना राज्याच्या राजकारणात बळ दिलं जात आहे. आगामी निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणूनही शिवसेनेकडून प्रोजेक्ट केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने केलेला सर्व्हे शिवसेनेची डोकेदुखी वाढवणारा आहे. कारण विधानसभेत स्वबळावर लढूनही भाजपला बहुमत मिळू शकतं, असा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील एका कॅबिनेट मंत्र्याने या सर्व्हेची माहिती दिली. याबाबत ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या दैनिकाने वृत्त प्रकाशित केलं आहे.तसेच या सर्व्हे बाबत न्यूज 18 समूहाने देखील बातमी दाखवली आहे.

काय आहे भाजपच्या सर्व्हेत?


‘विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना यांनी युती केल्यास आणि काँग्रेस-राष्ट्रवादीही सोबत लढल्यास युतीला 200 जागा मिळतील तर आघाडीच्या वाट्याला 88 जागा येतील. पण युती तुटून स्वबळावर लढल्यास भाजपला 160, शिवसेना 90 तर काँग्रेस-राष्ट्रवादी 38 जागांपर्यंत थांबेल. तसंच आघाडीत बिघाडी झाल्यास आणि शिवसेना-भाजप मात्र सोबत लढल्यास युतीला 230 जागांवर विजय मिळेल आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला मात्र केवळ 58 जागांवर समाधान मानावं लागेल,’ अशी आकडेवारी भाजपच्या सर्वेतून समोर आल्याचं सरकारमधील एका मंत्र्यानं सांगितलं आहे.

मुख्यमंत्री कुणाचा, भाजप-सेनेत कुरघोडी

मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाबाबत दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर कुरघोडी करत आहे. एकीकडे भाजपचे नेते मुख्यमंत्रिपदावर आमचाच माणूस बसेल, असं सांगत आहेत तर दुसरीकडे शिवसेनादेखील मुख्यमंत्रिपदावर आपला दावा सांगत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपर्यंत आमचं ठरलंय, असं सांगत असताना मात्र दोन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आमचाच होईल, असा दावा करत आहे. त्यामुळे अखेर सेना-भाजपचे ठरलं तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: