उजनी जुलै अखेर आले प्लस मध्ये, या पावसाळ्यात ३१ टीएमसी (61टक्के)आवक ,निरेत ही विसर्ग वाढला

पंढरपूर – राज्यात एकाबाजूला अनेक भागात जोरदार पावसाची बॅटिंग सुरु असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र अजूनही पर्जन्यमान नगण्य असल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली असतानाच एक दिलासादायक बातमी म्हणजे जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण आजपासून उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात केली आहे. शून्य पातळी ओलांडल्याने बळीराजा सुखावला आहे .

उजनी धरणात सोलापूर जिल्ह्यातील शहर व नदीकाठच्या गावांची आणि शेतीची तहान भागवण्याची ताकद आहे . मात्र सततच्या दुष्काळाने जिल्ह्याची संपूर्ण भिस्त ही याच धरणावरच अवलंबून आहे . गेल्यावर्षी कमी पाऊस पबला मात्र भीमा खोर्यात झालेल्या पावसाने उजनी धरण १०० टक्के भरले . मात्र पाणीटंचाईत जास्त पाणी वापरले गेले. यंदा ३ जुलै रोजी धरण वजा ५९.७४ टक्के अशा नीचांकी पातळीला पोहोचले होते . यंदा सोलापूर जिल्ह्यात अजूनही पावसाचे समाधानकारक आगमन झाले नसले तरी पुणे जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे गेल्या २७ दिवसात धरणामध्ये ३१ टीएमसी एवढे पाणी जमा झाल्याने मंगळवारी दुपारी बारा वाजता धरणाने वजा पातळीतून अधिक पातळीत प्रवेश केला आहे . उजनी हे राज्यातील मोठ्या धरणातील एक धरण असून यात १२१ टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे . आज उजनी धरणात ६३ टीएमसी पाणी जमा झाले असून याच पद्धतीने काही दिवस पुणे जिल्ह्यात पावसाची स्थिती राहिल्यास यंदाही उजनी १०० टक्के भरणे शक्य होणार आहे .कारण अद्यापही धरणार मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.

उजनी धरण प्लसमध्ये
दि :30/07/19
दुपारी 12.00वा
पाणी पातळी : 491.040
एकूण साठा : 1804.80
उपयुक्त साठा : 1.99
*टक्केवारी :  +0.13%*
बंडगार्डन विसर्ग : 26824
*दौंड विसर्ग : 44462*


वीर धरणातून ३२ हजार क्यूसेक्स विसर्ग सुरु

वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग मंगळवारी दुपारी १ वाजता वाढवण्यात आला असून ३२ हजार क्यूसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे नीरा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. 

नीरा नदीच्या खोऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळे नीरा खोऱ्यातील धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. भाटघर धरण ७० टक्के भरले आहे तर नीरा देवघर धरण ७८ टक्के भरलेले आहे. वीर धरण सोमवारी सकाळी ९८ टक्के भरले असून धरणातून दोन्ही काळव्यांना पाणी सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर नीरा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग सोमवारी पहाटे 3 वाजता २३ हजार क्यूसेक्स करण्यात आलेला होता. यात दुपारी 1 वाजता आणखी वाढ करण्यात आली. निरा नदीमध्ये ३२०७४ क्युसेक्स पाणीविसर्ग द्वार क्र २,३, ४,५, ६ ,७ व ८ हे ४ फूटाने उचलून सोडण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार त्यामध्ये नियंत्रण करण्यात येईल. धरणाचे ७ दरवाजे ४ फुटांनी उचलून ३२०७४ हजार क्यूसेक्स ने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, रविवारी वीर धरणातून सोडण्यात आलेले पाणी मंगळवारी संगम ( ता. माळशिरस) येथे भीमा नदीच्या पात्रात आले आहे. त्यामुळे पाऊस आणि  पाण्याअभावी संकटात सापडलेल्या भीमा नदी काठच्या शेतीला दिलासा मिळाला आहे. एक बाजूला उजनी धरण आता अधिकच्या पातळीत आलेले असून ते भरण्याची शक्यता बळावली असतानाच दुसऱ्या बाजूला वीरमधील पाणी भीमा नदीला आल्यामुळे भीमा काठच्या शेतकऱ्यांना दुष्काळात दिलासा मिळाला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: