मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात आज २२ मे रोजी सभा होणार आहे. पुण्याच्या स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी मनसे नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्याबद्दल गैरसमज पसरवणारे हे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत, असा सवाल वसंत मोरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केला आहे.
वसंत मोरे यांच्या उपस्थितीत शनिवारी कात्रज परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे पुणे शहराध्यक्ष यांच्याबद्दलच्या अफवांमुळे वसंत मोरे चांगलेच आक्रमक झाले. निलेश माझीरे हे वसंत मोरे यांच्या २० कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली. ही बातमी कोणी पसरवली माहिती नाही.
मात्र, त्यानंतर निलेश माझीरे यांच्याकडून माथाडी कामगार सेनेचे अध्यक्षपद काढून घेण्यात आले. निलेश माझीरे यांच्यावर कारवाई करण्याची इतकी घाई कोणाला झाली होती, असा सवाल वसंत मोरे यांनी फेसबुकद्वारे केला आहे. या फेसबुक पोस्टमुळे पुण्यातील मनसेमध्ये अंतर्गद वाद असल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसून आले आहे यावर आता प्रमुख राज ठाकरे काय निर्णय घेतायत हे पाहावे लागणार आहे.