झाडी, डोंगार, हाटील’ फेम आमदाराची तुफान फटकेबाजी

 

काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके!’ या शब्दांमुळे प्रकाशझोतात आलेले सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील यांनी आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अगदी गावरान शैलीमध्ये टीका केलीय. गुवाहाटीमधील हॉटेल ‘रेडिसन्स ब्लू’मध्ये बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केलेले आमदार वास्तव्यास असून याच ठिकाणी सर्व सहकाऱ्यांसमोर बोलताना शाहाजीबापू पाटील यांनी, काहीही करा फक्त शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेऊ नका अशी विनंती केलीय. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी आपल्या खास शैलीमध्ये केलेल्या भाषणादरम्यान सर्व उपस्थित आमदार खदखदून हसताना दिसत होते

“वसंतदादा पाटील हे माझे वडील आहे. त्यांच्या आशिर्वादाने मी आज मोठा झालेलो आहे. मी वसंतदादा पाटलांना कधीही दगा देणार नाही, असं शरद पवार म्हणाले अन् दीड वाजता तिथचं बातमी आली शरद पवारांनी बंड केलंय. ४० आमदार घेऊन काँग्रेसमधून पळून गेले. वसंतदादांचा राजीनामा,” असं म्हणत शहाजीबापूंनी भाषणाला सुरुवात करताच सर्व आमदार जोरजोरात हसू लागले.

पुढे शरद पवारांना टीका करताना, “ज्या ज्या माणसाला शरद पवारांनी जवळ घेतलं त्या माणसाला दाबून दाबून मारुन टाकलं, असा माझा अभ्यास आहे,” असंही शहाजीबापूंनी म्हटलंय. “आपण लांब आहे चांगलं आहे. त्यांच्या बाजूला जाऊ नका. बाकी काहीही निर्णय घ्या फक्त त्यांना जवळ करु नका. नाहीतर मेलो आपण,” असं शहाजीबापू म्हणताच पुन्हा सर्वजण जोरजोरात हसू लागले. अगदी सर्वांसमोर प्रमुख नेते म्हणून बसलेल्या एकनाथ शिंदेंनाही हसू अनावर झाल्याचं पहायला मिळालं.

Team Global News Marathi: