उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, आघाडी सरकार कोसळले

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज रात्री उशिरा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. त्याला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण न्यायालयाने त्याला स्थगिती देण्यास नकार दिला. हा महाविकास आघाडीला धक्का होता. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हा मोठा निर्णय घेतला.

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेला नामुष्की पत्करावी लागली. त्यानंतर लगेचच शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेडा फडकावला आणि त्यानंतर शिवसेना तसेच आघाडीतील इतर आमदार त्यांच्या गोटात सहभागी झाले. त्यामुळे हे ठाकरे सरकार अल्पमतात आले. मंगळवारी रात्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस व इतर नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन आघाडी सरकारची बहुमत चाचणी घ्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार 30 जूनला बहुमत चाचणीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्याचे आदेश दिले होते.

रात्री फेसबुकवरून त्यांनी संवाद साधताना त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व सहकारी मंत्र्यांचे आभार मानले. सर्व सुरळीत सुरू असताना दृष्ट लागली. रिक्षावाले, पानवाले असे ज्यांना मोठे केले, त्यांना नगरसेवक, मंत्री केले आणि तेच नाराज झाले. महाविकास आघाडीवर ते नाराज असतील तर, बाहेर पडून आघाडीला पाठिंबा देण्याची तयारी काँग्रेसने तयारी दर्शवली. पण ज्यांना आपले मानले ते समोर आले नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

त्यातच न्यायदेवतेने राज्यपालांच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय राखीव दल तैनात केले आहे. हे अयोग्य आहे. मला तर संख्याबळाचा खेळच खेळायचा नाही. ज्यांनी मोठं केलं त्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला खाली खेचायचे पुण्य हवे असेल तर, त्यांना ते पुण्य मिळावे. मुख्यमंत्रीपद सोडण्याचे दु:ख आम्हाला नाही. मी सर्वांसमोर आज मुख्यमंत्रीपदाचा व विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. उद्या रस्त्यावर शिवसैनिकांचे रक्त सांडू नये, हाच यामागचा उद्देश आहे, असे ते म्हणाले.

पुन्हा भरारी घेणार

आता माझ्या सर्व शिवसैनिक बांधव आणि भगिनींना घेऊन पुन्हा भरारी घेईन. शिवसेनेत नव्याने प्राण फुंकेन, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे गेल्या अडीच वर्षांत कोसळलेले हे दुसरे सरकार आहे. 23 नोव्हेंबर 2019मध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतली होती. पण सर्वोच्च न्यायालयात या सरकारला आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने खुले मतदान घेण्याचा आदेश दिल्यावर दोघांनीही राजीनामा दिला होता. हे सरकार 80 तासांचे ठरले. आताही सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राजीनामा दिला

ग्लोबल न्युज नेटवर्क: