युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यासमोर युवा सेनेच्या दोन गटात राडा

 

औरंगाबाद | औरंगाबाद मधील संत एकनाथ सभागृहाबाहेर युवासेनेचे दोन्ही गट आपआपसात भिडले असून युवासेनेच्या या दोन्ही गटांत नेमक्या कुठल्या विषयांवरुन वाद झाला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. औरंगाबादमधील या तुफान हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दोन्ही गटांतील वाद इतका वाढत गेला की थेट हाणामारी झाली. हाणामारी इतकी झाली की एकमेकांचे कपडे सुद्धा फाडण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

युवासेनेतील गटबाजी यापूर्वीही अनेकदा समोर आली आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत कशाप्रकारे काम करायचं आणि काय रणनिती याचं मार्गदर्शन करण्यासाठी वरुण सरदेसाई औरंगाबादमध्ये आहेत. वरुण सरदेसाई हे औरंगाबादमधील संत एकनाथ सभागृहात दाखल झाले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. मात्र, वरुण सरदेसाई सभागृहातून बाहेर पडताच युवा सेनेच्या दोन गटांत राडा झाला.

या घटनेनंतर युवासेनेचे शहाराध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, या कार्यक्रमात सर्व पदाधिकारी एकत्रितपणे बसले होते. कार्यक्रमासाठी वरुण सरदेसाई आले होते. सर्वांचं मार्गदर्शन झाल्यावर प्रमुख पदाधिकारी निघून गेल्यावर जेव्हा कार्यकर्ते सभागृहातून बाहेर पडत होते. त्यावेळी एकमेकांना धक्का लागल्याने दोन युवकांत हाणामारी झाल्याचं मला समजलं आहे. ते युवासेनेचे कार्यकर्ते होते की बाहेरुन आलेला कुणी व्यक्ती होता याचा शोध आम्ही घेत आहोत.

Team Global News Marathi: