युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची आजपासून ‘शिव संवाद’ यात्रा

 

महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची ‘शिव संवाद’ यात्रा उद्यापासून सुरू होत आहे. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात भिवंडी, नाशिक, दिंडोरी, संभाजीनगर आणि शिर्डीमधील नागरिकांशी आदित्य ठाकरे प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. या यात्रेमध्ये ते सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांच्या समस्या ते जाणून घेणार आहेत.

मुंबईतून निघाल्यानंतर ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वारावर आदित्य ठाकरे यांचे शिवसैनिक व युवासैनिक जल्लोषात स्वागत करणार आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची ही संवाद यात्रा समाजाच्या सर्व थरांतील जनता आणि शिवसैनिकांमध्ये नवी ऊर्जा, नवे चैतन्य निर्माण करणारी ठरणार आहे.

 

सत्तेच्या साठमारीत न पडता समाजकारणावर अधिक भर देऊन सर्वसामान्यांच्या समस्यांवर उपाय शोधून काढणे आणि त्यांना चिंतामुक्त करणे हा ‘शिव संवाद’ यात्रेचा मुख्य उद्देश आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून या ‘शिव संवाद यात्रा’ कार्यक्रमाची माहिती प्रसिद्धीसाठी देण्यात आली.

भिवंडी येथून शुभारंभ

उद्या गुरुवार, 21 जुलै रोजी भिवंडी येथे दुपारी 12 वाजता होणाऱया शिवसैनिकांच्या मेळाव्याने ‘शिव संवाद’ यात्रेचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर दुपारी 2.30 ते 2.50 शहापूर येथे तर 3.50 ते 4.15 इगतपुरी येथे स्वागत संवाद होईल. नाशिक येथे सायंकाळी 6.30 वाजता होणाऱया जनमेळाव्याने पहिल्या दिवसाच्या यात्रेची सांगता होईल.

दुसरा दिवस मनमाड ते संभाजीनगर

22 जुलै रोजी ‘शिव संवाद’ यात्रेच्या दुसऱया दिवशी सकाळी 11.45 वाजता मनमाड शहरात होणाऱया मेळाव्याला आदित्य ठाकरे संबोधित करतील. त्यानंतर दुपारी 1.40 ते 2 वाजेपर्यंत येवला आणि 2.45 ते 3 वाजेपर्यंत वैजापूर येथे स्वागत संवाद होईल. सायंकाळी 5.30 वाजता संभाजीनगर येथे ‘शिव संवाद’ मेळाव्याने दुसऱया दिवशीच्या कार्यक्रमाची सांगता होईल.

तिसरा दिवस पैठण ते शिर्डी, साईबाबांचे दर्शन घेणार

तिसऱया दिवशी 23 जुलै रोजी ‘शिव संवाद’ यात्रेत सकाळी 11.30 वाजता पैठण येथे शिवसैनिकांकडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले जाणार आहे. दुपारी 2 वाजता गंगापूर येथेही स्वागत संवाद होईल. त्यानंतर दुपारी 2.50 वाजता नेवासा येथे ‘शिव संवाद’ मेळाव्याचे आयोजन केले गेले आहे. सायंकाळी 4.30 वाजता आदित्य ठाकरे यांचे शिर्डी येथे शिवसैनिकांकडून स्वागत होईल. त्यानंतर ते साईबाबांचे दर्शन आणि आशीर्वाद घेणार आहेत.

Team Global News Marathi: