आपला पगार जनतेच्या घामाच्या पैशांतून मिळतो याचे भान ठेवा – अजित पवार

 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे परखड मतासाठी ओळखले जातात. त्यातच पालघर या नव्या जिल्ह्याच्या जिल्हाधीकारी कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी अजित पवारांनी आपले मत मांडले होते. एखादी वास्तू, प्रकल्प, योजना या लोकांच्या श्रमाच्या, घामाच्या पैशांतून उभ्या राहत असतात. आपल्याला मिळतो तो पगारही जनतेच्या पैशांतून दिला जात असल्याची जाणीव आमच्यासह सर्वांनी ठेवून जनतेच्या कामाला प्राधान्य द्यावे, असे परखड मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालघर मुख्यालयाच्या इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात व्यक्त केले.

पालघर हा नवनिर्मित तरुण जिल्हा असून, या जिल्ह्याला विकासाच्या धर्तीवर बळ देण्याचे काम महाविकास आघाडी करेल. देशात पालघर जिल्हा सर्वोत्तम जिल्हा असल्याचे आपल्या कामातून दाखवून देऊ या, असे सांगून आपला पालघर जिल्हा विविधतेने नटलेला संपन्न जिल्हा असल्याने आपण एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

पालघर जिल्हा संकुलातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद आणि प्रशासकीय कार्यालय इमारतीचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभासी प्रणाली (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग)द्वारे केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आदी उपस्थित होते.

Team Global News Marathi: