तुझा नवरा गेला तुझा शृंगार संपला…अस का? वाचा सविस्तर-

तुझा नवरा गेला तुझा शृंगार संपला…

मी सहा सात वर्षाची असताना माझ्या आईचे वडील गेले. जेव्हा आम्ही आईच्या माहेरी अंत्ययात्रेसाठी गेलो तेव्हा तिथलं वातावरण पाहून छातीत धडधड सुरू झाली. माझी आजी आजोबांच्या निर्जीव देहापुढे आवेगाने रडत होती.आजीचा अवतारही पाहवत नव्हता….

कारण तिच्या केसात प्रचंड गजरे फुलं माळली होती, कपाळावर कुंकवाचा मळवट भरला होता..सगळं बघून थोडं वेगळं वाटलं..काय घडतंय काही कळत नव्हतं… आजोबांची प्रेतयात्रा जात असताना आजीच्या केसात माळलेले सगळे गजरे काढले, गळ्यातील काळ्या मण्याची पोत, भरलेली ओटी सगळं एकत्र गोळा करून आजोबांच्या प्रेतयात्रेबरोबर दिलं..

हातातील बांगड्या फोडण्यात आल्या…. जवळ उभी असलेली बाई माझ्या आजीला म्हणाली तुझा नवरा गेला तुझा शृंगार संपला…. शृंगार संपण म्हणजे काय त्यावेळी उमगलं नाही…पण पुढच्या वेळी जेव्हा पाहिलं तेव्हा मोकळ्या कपाळाची आजी माझ्याने पाहवली नाही.…

कॉलेजमध्ये 2nd year ला असताना माझ्या वडिलांचे वडील गेले…जे चित्र मला दुसऱ्या इयत्तेत असताना दिसलं तेच चित्रं मला पुन्हा १४ वर्षांनी पाहायला मिळालं..तिथं जवळ असलेली बाई माझ्या आजीला म्हणाली “नानी नाना गेले तुझा शृंगार संपला… (माझ्या आजीला गावात सगळे नानी म्हणायचे)..यावेळी मात्र मला रडू आवरत नव्हतं..खूप विरोध करावासा वाटला पण मी करू शकले नाही, याची खंत मला तेव्हाही वाटली होती आणि आजही वाटतेय….

जवळपास तीन महिन्या पूर्वीची गोष्ट…. दुर्दैवाने माझ्या जवळच्या मैत्रीणीचा नवरा गेला…आज २०१९ मध्येही तिलाही हे ऐकावं लागलं “तुझा नवरा गेला तुझा शृंगार संपला…तिच्याही केसात माझ्या आजीच्या केसात माळले होते तसे भरगच्च गजरे होते.फुल होती…

कपाळावर कुंकूवाचा मळवट होता… नवऱ्याच प्रेत जस उचललं तसा मळवट तिथं उपस्थित बायकांनी पुसला, तिच्या हातात भरलेल्या बांगड्या फोडायला लावल्या…विचित्र पद्धतीने तिला आक्रोश करायला लावला..(अर्थात त्या सगळ्या त्यांच्या कुटुंबातील त्या स्त्रिया होत्या)…

…मुळात नवरा बायको हे एकमेकांचे soulmate आहेत एकमेकांचे partner आहेत..आपला जीवनसाथी जाण्याने पराकोटीच दुःख होतं ही बाब सहाजिक आहे…पण नवरा गेला म्हणून शृंगार कसा काय संपू शकतो.. .मुळात नवरा आयुष्यात येण्याआधीही ती स्त्री शृंगार करत..मग पतीच्या मृत्यूनंतर का बरं तिची विटंबना…

वाचताना जरी अतिशयोक्ती वाटली मात्र दुर्दैवाने आजही ही स्थिती गावागावांत आहे…त्यामुळे अशीही गलिच्छ प्रथा बंद व्हावी…प्रत्येक माणूस आपले आयुष्याचे श्वास घेऊन येतो..बायकोच्या जाण्याने जर नवऱ्याचा शृंगार संपत नाही.मग नवऱ्याचा जाण्याने एका स्त्रीचा शृंगार कसा काय संपू शकतो??
_Sima Bhoir

ग्लोबल न्युज नेटवर्क: