तुम्हालाही हाय बीपीचा त्रास आहे? या पदार्थांना ठेवा आहारातून दूर

 

मुंबई | आरोग्याच्या बहुतांश समस्यांवर औषधोपचाराबरोबरच आहार सर्वात महत्त्वाचा भाग असतो. तुम्ही कसा, कोणत्या वेळेला, काय आणि किती आहार घेता यावर तुमच्या तब्येतीच्या बराचशा गोष्टी अवलंबून असतात. आरोग्याच्या तक्रारींनुसार आपण आहारात बदल केले तर आपली तब्येत सुधारण्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. तसे पाहता उच्च रक्तदाबावर कोणता असा ठोस उपाय अद्याप सापडलेला नाही.

मात्र काही औषधांनी आणि आहारातील बदलांनी त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. १२०/८० हे सामान्य ब्लड प्रेशर आहे. १३०/९० असले तरी चिंता करण्याची फार आवश्यकता नसते. मात्र ते त्याहून जास्त झाले आणि वाढलेल्या रक्तदाबावर वेळीच उपचार न केल्यास हृदयाशी निगडीत समस्यांना कारणीभूत ठरु शकते. आता आहारातील कोणते पदार्थ आहेत ज्यावर आपण नियंत्रण ठेवले तर रक्तदाब नियंत्रणात राहू शकेल, पाहूया

मसालेदार पदार्थ

मसालेदार पदार्थ खाणे कोणाच्याच आरोग्यासाठी चांगले नसते. मात्र ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशांनी तर मसालेदार पदार्थ टाळलेले केव्हाही चांगले. आपण आहारात वापरत असलेले मसाल्याचे विविध पदार्थ उच्च रक्तदाबाची समस्या वाढवतात. त्यामुळे कमीत कमी समाले असलेले पदार्थ खायला हवेत.

कॅफेन
उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी कॅफेनचा आहारात समावेश करु नये. म्हणजेच कॉफी, सोडा यांसारखी पेये या लोकांसाठी घातक ठरु शकतात. उच्च रक्तदाब असलेल्यांनी चहापासून दूर राहिल्यासही चांगले. आपल्याकडे दिवसातून किमान दोन ते ३ वेळा चहा-कॉफी घेण्याची पद्धत आहे. मात्र आपल्याला रक्तदाबाचा त्रास असेल तर आपण त्याऐवजी सरबत, दूध, शेक अशा पर्यायी गोष्टी घ्याव्यात.

साखर
साखर ही केवळ शुगर असलेल्या लोकांसाठी घातक असते असे आपल्याला वाटते. मात्र उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनीही साखर खाणे टाळावे. जास्त साखर किंवा गोड पदार्थ खाल्ल्यास लठ्ठपणा वाढतो आणि उच्च रक्तदाबासाठी तो कारणीभूत ठरतो. त्यामुळे गोड खाण्यावर नियंत्रण ठेवलेले केव्हाही चांगले.

मीठ
हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांसाठी मीठ हे विषाप्रमाणे काम करते. त्यामुळे नियमित आहारात जास्त प्रमाणात मीठ खाणे तसेच नमकीन पदार्थांचे वारंवार सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते.

Team Global News Marathi: