तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आला आहे, सामनातून फेसबुकला समज….!

तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आला आहे, सामनातून फेसबुकला समज….!

वॉल स्ट्रीट जनरल या अमेरिकेतील मुख्य वर्तमान पत्राने जाहीर केलेल्या अहवालामुळे भारतीय राजकारणात मोठी उलथापालथ झालेली आढळून आली होती. तसेच सोशल मीडियाच्या जगात मोठी लढाई सुरु झालेली देखील पाहायला मिळाली. या अहवालानुसार भाजप आणि आरएसएस फेसबुक आणि व्हॉट्सअप नियंत्रित करत असून, त्याद्वारे द्वेष पसरवत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. यावर आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून जोरदार टीका करण्यात आली आहे.

तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आलाय. उद्योग व्यवसायातील किमान काही नितीनियम तुम्हाला पाळावेच लागतील. तुमचा धंदा कमी होईल म्हणून दळभद्री विचार व लढायांचे व्यासपीठ म्हणून फेसबुकसारख्या माध्यमांचा वापर सुरू असेल तर याकडे कानाडोळा करता येणार नाही, अशा शब्दात सामनातून फेसबुकवर हल्ला चढविला आहे.

तसेच भारतातील लोकसंख्या हाच फेसबुकचा मोठा बाजार आहे, हे सांगताना फेसबुकच्या व्यावसायिक धोरणावरही टीका केली आहे. भाजपच्या नेत्यांनी काही द्वेष पसरविणारा मजकूर टाकला व त्यावर कारवाई करू नये म्हणून फेसबुकवर दबाव आणला, हे फेसबुक कंपनीनंही मान्य केले असल्याचे सामनातून सांगण्यात आले आहे.

अग्रलेख जसाच्या तसा

फेसबुकसारख्या माध्यमांवर वाद-प्रतिवाद व्हायला हरकत नाही, पण द्वेष पसरवून देश व समाज तोडणारी भाषा वापरली गेली असेल तर त्यावर पक्षाचा विचार न करता कारवाई व्हायला हवी. द्वेष पसरवणारी व्यक्ती सत्ताधारी पक्षाची आहे म्हणून फेसबुकसारख्या कंपन्यांना डोळेझाक करता येणार नाही. तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आलाय. तेव्हा उद्योग-व्यवसायातले किमान नीती-नियम पाळावेच लागतील. धंदा कमी होईल म्हणून दळभद्री विचार व लढायांचे व्यासपीठ म्हणून फेसबुकसारख्या माध्यमांचा वापर सुरू असेल तर त्याकडे काणाडोळा करता येणार नाही!

फेसबुक, ट्विटरसारख्या समाज माध्यमांत नेमके काय चालले आहे यावर प्रकाशझोत टाकण्याचे काम ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने केले आहे. फेसबुक, व्हॉट्सऍपवर भाजप किंवा संघाचेच नियंत्रण आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यास ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मधील वृत्ताचा आधार आहे. समाज माध्यमांतून समाज जोडण्याचे काम न होता समाजात दुभंग आणि द्वेष पसरवण्याचे कार्य जोरात सुरू आहे. समाज माध्यमांतून उदयास आलेल्या असंख्य गोबेल्सनी स्वतःचा कायदा, स्वतःची न्यायव्यवस्था, स्वतःचे तुरुंग, आरोपींसाठी पिंजरे केले आहेत व एकांगी झोडपेगिरी करत हे सर्व गोबेल्स कोणालाही आरोपी करून सुळावर चढवत असतात याबाबतचे सत्य अमेरिकन माध्यमांनी उघड केले आहे.

समाज माध्यमांतील हे नवे ‘लश्कर ए होयबा’ राजकीय पक्ष व संघटनांचे पगारी नोकर असतात. ते आपल्या विचारांचा प्रचार करतात तसे इतरांविषयी जहरही पेरत असतात. 2014 ची लोकसभा निवडणूक भाजपने मोदी यांच्या नेतृत्वाखाली जिंकली. त्यात भाजपच्या समाज माध्यमांवर काम करणाऱया पगारी फौजांचे योगदान मोठे होते. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग तसेच राहुल गांधी यांना या गोबेल्स टोळीने साफ निकम्मे ठरवले. मनमोहन हे ‘मौनीबाबा’ तर राहुल गांधी यांना ‘पप्पू’ ठरवण्यात आले. त्याच वेळी मोदी हे सुपरमॅन, एकमेव तारणहार, विष्णूचे तेरावे अवतार असल्याचे शिक्कामोर्तब समाज माध्यमांनी करून टाकले. गेल्या सात वर्षांत खोटय़ाचे खरे व खऱ्याचे खोटे करण्याचे प्रकार समाज माध्यमांतून उघडपणे झाले. अफवा तसेच

जातीय-धार्मिक द्वेष पसरवून

राजकीय लाभ उठवले गेले. ‘‘हिंदुस्थानात फेसबुक व व्हॉट्सऍप भाजप व संघाच्या नियंत्रणाखाली असून त्यांनी या माध्यमांतून खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवला आहे. मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी याचा उपयोग केला आहे, पण आता अमेरिकन माध्यमाने फेसबुकविषयीचे सत्य उघड केले,’’ असे मत राहुल गांधी यांनी समाज माध्यमावरच व्यक्त केले. भाजपच्या काही नेत्यांनी द्वेष पसरवणारा मजकूर फेसबुकवर टाकला व त्यावर फेसबुकने कारवाई करू नये यासाठी दबाब आणला, हे ‘फेसबुक’ कंपनीनेच मान्य केले आहे.

यावर फेसबुकच्या हिंदुस्थानातील संचालकांचे सांगणे असे की, ‘‘भाजप नेत्यांवर हिंसाचार पसरवणाऱ्या पोस्टवरून कारवाई केल्यास कंपनीच्या हिंदुस्थानातील व्यावसायिक वाढीला धोका निर्माण होऊ शकतो.’’ हेच फेसबुकचे व्यावसायिक धोरण आहे. हिंदुस्थानातील अफाट लोकसंख्या हाच फेसबुकचा जगातला मोठा बाजार आहे. लॉकडाऊन काळात हिंदुस्थानातच सर्वाधिक लोक फेसबुकचा वापर करीत होते. धंद्याचे सगळय़ात मोठे ठिकाण म्हणून फेसबुक हिंदुस्थानकडे पाहते.

फेसबुकने मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओबरोबर 5.7 अब्ज डॉलर्स गुंतवणूक हिंदुस्थानात केलीच आहे. ‘टिकटॉक’ या चिनी ऍपचा सगळय़ात मोठा बाजार हिंदुस्थानात होता तसा तो फेसबुकचाही आहे. फेसबुकचे प्रकरण एकतर्फी नाही. राहुल गांधी यांनी भाजपवर आरोप केले तसे काही आरोप केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले आहेत. ‘‘निवडणुकीपूर्वी केंब्रिज ऍनालिटिका आणि फेसबुकशी संगनमत केल्याप्रकरणी काँग्रेसला पकडले होते. आता

कोणाच्या तोंडाने

भाजपवर आरोप करताय?’’ असा सवाल श्री. प्रसाद यांनी डागला आहे. सध्या सगळय़ात जास्त राजकारण हे फेसबुक, ट्विटरसारख्या माध्यमांवर सुरू आहे. व्हॉट्सऍपचे नवे राजकीय विद्यापीठ उदयास आले आहे ते वेगळेच. या माध्यमांमुळे अनेकांच्या प्रतिभेस बहर आला, व्यासपीठ मिळाले हे खरे. त्यामुळे जगही जवळ आले, पण समाजात दरी निर्माण झाली हेसुद्धा तितकेच खरे. फेसबुकसारख्या माध्यमांवर वाद-प्रतिवाद व्हायला हरकत नाही, पण द्वेष पसरवून देश व समाज तोडणारी भाषा वापरली गेली असेल तर त्यावर पक्षाचा विचार न करता कारवाई व्हायला हवी.

द्वेष पसरवणारी व्यक्ती सत्ताधारी पक्षाची आहे म्हणून फेसबुकसारख्या कंपन्यांना डोळेझाक करता येणार नाही. ‘मुसलमान विरुद्ध हिंदू’ असा वाद निर्माण करण्याचे व्यासपीठ फेसबुक नाही. सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणीही फेसबुकवर काही गटांनी स्वतःचा कायदा, स्वतःची तपास यंत्रणा, स्वतःचे वेगळे न्यायालयच निर्माण केले. पार्थ पवारचे काय चुकले, काय बरोबर? त्याने आता काय केले पाहिजे? याचे धडे अशा समाज माध्यमांवर देणाऱया टोळ्यांना जगाचे तारणहार मानावे काय? सोशल माध्यमांवर एखाद्याची यथेच्छ बदनामी करणे हा आता ‘पगारी’ व्यवसाय झाला आहे व त्यातून कोणीही सुटलेले नाही.

कालपर्यंत मनमोहन सिंग यांना दूषणे देणारे आज त्याच माध्यमांचा वापर करून पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीसांची खिल्ली उडवतात याचे वाईट वाटते. तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आलाय. तेव्हा उद्योग-व्यवसायातले किमान नीती-नियम पाळावेच लागतील. धंदा कमी होईल म्हणून दळभद्री विचार व लढायांचे व्यासपीठ म्हणून फेसबुकसारख्या माध्यमांचा वापर सुरू असेल तर त्याकडे काणाडोळा करता येणार नाही!

You have come to do business in our country, understand Facebook from the match ….!

ग्लोबल न्युज नेटवर्क: