तुम्हाला कोरोना होऊन गेलाय; तर मग हे करा आणि शरीराची क्षमता पूर्ववत ठेवा

उपचारातून बहुतांश जण कोरोनातून बरे होतात. पण त्यानंतरही त्यांना अनेक त्रास होतच असतात. त्यामुळे सावध राहणे आवश्यक आहे. कमालीचा थकवा येतो. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. कोरोनाने फुप्फुसांची क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे श्वसनावाटे घेतलेला ऑक्सिजन रक्तात मिसळवून शरीराला पुरवण्यात फुप्फुस कमी पडत असते. शरीराला पूर्वीची ताकद मिळवून देणे आवश्यक असते. योग, पौष्टिक आहार, व्यायाम, पुरेशी झोप आदी उपायांनी आपण शरीराची क्षमता पूर्ववत करू शकतो असा सल्ला वैद्यक शास्त्रातील तज्ञांनी दिला आहे.

असे करा श्वसनाचे व्यायाम

 

हळूहळू मोठा श्वास घ्या आणि फुगा फुगवतो तसा तोंडाने सोडून द्या.

स्पायरोमीटरनेही फुप्फुसाची क्षमता वाढवता येऊ शकते.

सुरुवातीला स्पायरोमीटरने व्यायाम करताना जोराने श्वास घेऊ नका.

फुप्फुसावर जास्त ताण येईल इतक्या मोठय़ाने श्वास घेऊ नका.

प्राणायाम सुरू करण्यापूर्वी कपालभाती क्रिया करा. त्यामुळे फुप्फुसातील अनावश्यक हवा बाहेर पडण्यास मदत होईल.

प्राणायामात अनुलोम-विलोम क्रिया करा.

फुप्फुसात थोडी ताकद आल्यानंतर भस्त्र्ाका हा योगप्रकार करा.

पौष्टिक आहार घ्या, अन्न चांगले चावून खा!

पचायला हलका, पण पौष्टिक असा आहार घ्या.

फळे आणि भाज्यांचे प्रमाणात जेवणात जास्त असावे.

गव्हाऐवजी ज्वारी, बाजरी किंवा मक्याची भाकरी खा.

अन्नाचा प्रत्येक घास किमान 24 वेळा चावून खा.

पचेल इतके प्रमाणातच जेवण घ्या.

पुरेशी झोप म्हणजे रामबाण औषध

पुरेशी झोप हे एक रामबाण औषध आहे. रोज किमान 7 ते 8 तासांची झोप घेतली पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी एक तास आणि सकाळी उठल्यानंतरचे दोन तास मोबाईल फोन दूर ठेवल्यास शांत झोप लागेल असाही आग्रहाचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. तुमचे डोके जितके शांत राहील तितके शरीराचे काम उत्तम प्रकारे चालेल असे ते सांगतात.

कच्च्या लसणाची एक पाकळी…बस्स!

उपचारादरम्यान औषधांच्या हेवी डोसमुळे शरीरावर परिणाम होतो. रक्त गोठले जाते. ते पातळ करणे आवश्यक असते. रोज कच्च्या लसणाची एक पाकळी त्यासाठी पुरेसी आहे. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी लसणाची पाकळी दातांनी चावून-चावून नंतर पाण्याबरोबर पोटात घ्यावी. याशिवाय पुढील उपायांनीही नैसर्गिकरीत्या रक्त पातळ करता येऊ शकते.

हळद घातलेले गरम दूध प्यावे.

आल्याचे पाणी बनवून सकाळी रिकामी पोटी दोन ग्लास घ्यावे.

दालचिनीचा रोजच्या आहारात वापर करावा.

मोबाईल फोनपासून दूर रहा!

कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेक जण मोबाईल फोनला चिकटतात. मोबाईलवर सतत बोलत असतात किंवा मग त्यावरून व्हिडीयो, फोटो पाहणे किंवा पाठवणे असे काम सुरूच असते. त्यासाठी शरीराची बरीच ऊर्जा नकळत खर्च होत असते. त्यामुळे अशक्तपणा वाढतो.

प्राणायामाने फुप्फुसाची क्षमता वाढवा

कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींना त्यांची फुप्फुसाची गमावलेली क्षमता पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी प्राणायाम हा उत्तम उपाय असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. सुरुवातीला अशक्तपणामुळे प्राणायाम जमत नाही. त्यामुळे श्वसनाच्या व्यायामाने हळूहळू सुरुवात करावी.

मानसिकदृष्टय़ाही सक्षम व्हा!

कोरोनामुळे सर्वांच्याच फुप्फुसांची क्षमता कमी होते असे नाही. तो केवळ गैरसमज आहे. आजारामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झालेले असते. त्यामुळेही उपचारानंतर दम लागणे, थकवा येणे अशा तक्रारी उद्भवत असतात. त्यासाठी पौष्टिक आहारावर अधिक भर दिला पाहिजे. शरीराच्या तंदुरुस्तीवर भर देण्याबरोबरच मानसिकदृष्टय़ाही सक्षम व्हायला हवे.

गरम पाणी प्या. व्हिटॅमिन-सी घ्या.

थकवा येईल, अशी धावपळ टाळा.

हिमोग्लोबिन लेव्हल चांगली व्हावी म्हणून पालेभाज्या, सोयाबिन, दूध, काळा खजूर, आंबा, चिकू यांचा आहारात समावेश करा.

रोजचे दोन वेळचे जेवण सकाळ, दुपार, सायंकाळ आणि रात्र अशा चार भागांमध्ये विभागा. जेणेकरून ते पचायला सोपे जाईल. त्यामुळे ऑसिडिटीही वाढणार नाही.

– डॉ. जयसिंह फडतरे, ज्येष्ठ श्वसनविकार तज्ञ

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: