येत्या २४ तासांत कोकणात दाखल होणार, राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

 

गेल्या काही दिवसांपासून मान्सूननं हळूहळू पुढे सरकण्यास सुरुवात केली आहे. मात्र येत्या काही तासांतच मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यासोबतच राज्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. काल राज्यातील अनेक भागांत पावसानं दमदार हजेरी लावली. मुंबईसह उपनगरांत पावसाच्या सरी कोसळताना दिसल्या. तसेच, राज्यातील काही जिल्ह्यातही पावसाची हजेरी दिसून आली.

मुंबईत दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर ठाणे, गोरेगाव, कल्याणमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मान्सूनपूर्व सरींमुळं काहीसा दिलासा मिळाला आहे. भिवंडी शहरासह ग्रामीण भागामध्ये काल अचानक वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू झाल्याने परिसरात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर वादळी वाऱ्यामुळे शहरात तीन ठिकाणी झाडे कोसळल्याची घटना घडली आहे.

अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यातील काही भागात रात्री मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यात महाबळेश्वरला जाणाऱ्या पसरणी घाटात धुक्याची चादर पसरलेली पसरली असून अनेक ठिकाणी घाटरस्ते या धुक्यात हरवले होते. या धुक्यातून वाट काढत पर्यटक मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत.

Team Global News Marathi: