यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिले ५० लाखांचे घड्याळ, २ कोटीच्या भेटवस्तू?

 

मुंबई | स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव यांच्याकडे आयकर विभागाने केलेल्या चौकशीत १२ शेल कंपन्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर विभागाने २५ फेब्रुवारीपासून यशवंत जाधव कुटुंबीयांसह त्यांचे निकटवर्तीयांच्या ३३ ठिकाणी छापेमारी केली. यातून महत्त्वाची माहिती तसेच दस्तावेज समोर आल्याचे सांगितले जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, एक डायरी अधिकाऱ्यांच्या हाती लागली असून, यामध्ये अनेक संशयास्पद नोंदी सापडल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. यशवंत जाधव, चे निकटवर्तीय आणि कंत्राटदारांच्या संबंधित ३५ हून अधिक ठिकाणी केलेल्या प्राप्तिकर विभागाच्या छापेमारीत १३० कोटी रुपयांपेक्षा अधिक स्थावर मालमत्ता आढळून आली आहे. यातच, जाधव व त्यांच्या निकटवर्तीयांनी गेल्या दोन वर्षांत ३६ मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाने केलेल्या छापेमारीत महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली असून, यामध्ये एक डायरी मिळाली आहे. या डायरीत, ५० लाखांचे घड्याळ दिले असून, गुढी पाडव्याच्या दिवशी सुमारे २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू मातोश्रीला दिल्याची नोंद आढळून आल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे यशवंत जाधव यांनी दावे फेटाळले असून आपल्या आईला या वस्तू भेट म्हणून दिल्याचे त्यांनी आपले म्हणणे मांडले आहे.

आईच्या वाढदिवसाला घड्याळ भेट दिले होते, तर गुढीपाडव्याला आईच्या नावाने २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू वाटल्या होत्या, असा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे. या संशयास्पद नोंदींशिवाय, न्यूजहॉक मल्टिमिडिया कंपनीशी अनेकविध प्रकारचे संशयास्पद व्यवहार झाल्याचेही आढळून आले आहे. या कंपनीच्या मालकाचे नाव विमल अग्रवाल आहे. याचाही तपास केला जात आहे.

Team Global News Marathi: