यशवंत जाधव यांच्या घरी २४ तासांनंतरही आयकर विभागाची छापेमारी सुरूच

 

मुंबई | शिवसेनेचे नेते आणि मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. २४ तास उलटल्यानंतरही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून यशवंत जाधव यांच्या घरी चौकशी सुरूच आहे. यशवंत जाधव यांच्या घरी शुक्रवारी सकाळी साधारणत: सात वाजता आयकर विभागाने धाड टाकली आणि चौकशी सुरू केली. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार आयकर विभागाची ही चौकशी अद्यापही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपच्या नेत्यांकडून यशवंत जाधव यांच्यावर भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी यशवंत जाधव यांच्या घरी धाड टाकली. गेल्या २४ तासांनंतर आताही आयकर विभागाची ही कारवाई सुरू आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशीत काही व्यवहारांबाबत ठोस पुरावे, माहिती मिळाली की नाही याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. शिवसैनिक आक्रमक यशवंत जाधव यांच्या घरी सुरू असलेल्या या आयकर धाडीदरम्यान शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत.

यशवंत जाधव यांना आयकर विभागाचे अधिकारी घरातून नेणार असल्याची माहिती पसरली आणि मग रात्रीच शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली. यशवंत जाधव यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा पाहता पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला. शिवसैनिकांना शांतता राखण्याचं महापौरांनी आव्हान केले आहे.

Team Global News Marathi: