मुंबईत अखेर पूर्ण क्षमतेनं शाळा सुरु होणार, मुंबई मनपाकडून परिपत्रक जारी

 

मुंबई | मुंबईत आता कोरोनाचा प्रभाव कमी होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व बोर्डच्या सर्व माध्यमाच्या नगरबाहय विभागाच्या सर्व शाळा तसेच विशेष व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्व शाळा, मैदानी खेळ व शाळेचे विविध शैक्षणिक उपक्रम यासह पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने सुरु करण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे. याच पार्श्वभूमीवर २ मार्चपासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा कोविड-१९ पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने ऑफलाईन पद्धतीने सुरु होणार आहेत. यासंदर्भात परिपत्रक बीएमसीकडून जारी करण्यात आलं आहे.

परिपत्रकात म्हटलं आहे की, २ मार्चपासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्वच्या सर्व माध्यमाच्या व नगरबाहय विभागाच्या पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या सर्व शाळा कोविड-१९ पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने ऑफलाईन पद्धतीने सुरु कराव्यात. विशेष व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळामुद्धा ऑफलाईन पद्धतीने पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने सुरु करण्यात याव्यात.

मुंबई मनपाने म्हटलं आहे की, विद्यार्थी शाळेत प्रवेश करताना त्यांचे तापमान तपासणी करण्यात यावी. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती 100% असणे आवश्यक आहे. कोरोना पूर्वीच्या वेळापत्रकानुसार शाळांच्या नियमित वर्गाच्या सामामध्ये मैदानी खेळ शालेय कवायती तसेच विविध सहशालेय शैक्षणिक उपक्रम घेण्यात यावेत. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास प्रवृत्त करावे.

Team Global News Marathi: