या दलाल नेत्यांवर थुका चपलेचा हार घाला, औरंगाबादच्या नामांतरावरून जलील संतापले

 

औरंगाबाद: औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावे अशी मागणी लावून धरण्यात आली होती. आता त्याला अखेर मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. शिवसेना मंत्र्यांनी हा प्रस्ताव कॅबिनेटसमोर आणला होता. त्यानंतर कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामकरणास मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयावरुन एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, त्यांनी सरकारवर खोचक शब्दात टीकाही केली.

या निर्णयानंतर माध्यमांशी संवाद साधताना जलील म्हणाले की, ”आजचा निर्णय अतिशय घाणेरड्या राजकारणासाठी घेण्यात आला आहे. आता शहरातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या फोटोवर चपलांचा हार घातला पाहिजे. राजकारणासाठी हे नेते अतिशय खालच्या पातळीवर आले. आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे दलाल नेते रस्त्यावर फिरताना दिसले, तर त्यांच्या अंगावर थुंका. यांनी अतिशय खालच्या पातळीचे राजकारण केले. सत्तेचा इतकाच मोह होता, तर सत्तेला चिटकून बसायला हवं होतं. आम्ही चपला मारू अशा नेत्यांना,” अशी घणाघाती टीका जलील यांनी केली.

यावेळी जलील यांनी देशातील प्रमुख नेत्यांवरही टीका केली. ”मला शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी, अशोक चव्हाण आणि मराठवाड्यातल्या सर्व नेत्यांना विचारायचंय, हा निर्णय घेतला जात होता, तेव्हा तोंडात लाडू टाकून बसला होतात का? आता येऊन दाखवा औरंगाबादला, मग दाखवू तुम्हाला. उद्धव ठाकरे आमच्या मनात तुमच्याबद्दल आदर होता, पण जायची वेळ आली तर नीट जायचं ना, असे घाणेरडे राजकारण करण्याची गरज नव्हती असा संताप व्यक्त केला.

Team Global News Marathi: