मुंबई | सध्या कोरोनावर नियंत्र मिळवत असताना ओमायक्रॉनने पुन्हा एकदा जगभराचं नाही तर महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे. आज तागायत एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. या ३१ नव्या प्रकरणांपैकी २७ रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. तर दोन जण ठाण्यात, १ जण पुण्यात आणि एक जण अकोल्यात आढळून आला आहे. याच बरोबर आता राज्यातील ओमायक्रॉन बाधितांचा एकूण आकडा १४१ वर पोहोचला आहे. त्याचवेळी मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९२२ नवे रुग्ण आढळून आले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे.
यापूर्वी, महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत, मुंबई मनपा आयुक्तांनी नवीन वर्षाच्या पार्ट्यांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. यात खुल्या किंवा बंद ठिकाणी लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. हा आदेश रात्री १२ वाजल्यापासून लागू झाला आहे. यापूर्वी, महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये, रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय जिम, स्पा, हॉटेल्स, थिएटर्स आणि सिनेमा हॉलसाठी ५० टक्के क्षमतेचे निर्बंध घालण्यात आले आहेत.
त्याचप्रमणारे सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्यांची संख्या १०० पेक्षा जास्त नसावी आणि खुल्या जागेत ही संख्या २५० पेक्षा अधिक किंवा त्या ठिकाणच्या क्षमतेच्या २५ टक्के, यांपैकी जे कमी असेल तेवढीच असावी, अशी मार्गदर्शक तत्त्वेही सरकारने जारी केली आहेत.