…मनापास्नं-तळमळीनं काम करनार्‍या प्रतिभावानाला मुलखाच्या अडचनी असत्यात भावांनो !

 

अभिनेता किरण माने यांना न सांगा कार्यक्रमातून काढून टाकल्यानंतर आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात त्यांनी आवाज उर्ववला होता तसेच त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून आले होते अशातच मागच्या अनेक दिवसांपासून परखड मत मांडणारे अभिनेता किरण माने यांनी पुन्हा एकदा विरोधकांना आपल्या लेखातून सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.

…मनापास्नं-तळमळीनं काम करनार्‍या प्रतिभावानाला मुलखाच्या अडचनी असत्यात भावांनो ! त्यांच्या कामात खोडा घालनारी काड्याघालू लोकं सगळीकडं असत्यात., काॅर्पोरेट कंपनी असो, सरकारी हापीस असो, आमचं सिरीयल-सिनेमा-नाट्यक्षेत्र असो, क्रिडाक्षेत्र असो… मानूस झोकून देऊन काम करनारा आसंल – पॅशनेट आसंल – त्याची बुद्धीमत्ता कामातून झळकत आसंल… तर उगं रोजावर आल्यागत पाट्या टाकून ‘पर डे’चा हिशोब जमवनारी त्याच्या आसपासची जी ‘चुकार’ बेनी असत्यात, ती त्याचा रागराग करतात.. कायतरी खुस्पटं काढून त्याला उगं त्रास देत्यात.. कारन त्याच्या कर्तव्यदक्षतेमुळं या बधिर बांडगुळांच्या कामातल्या चुका, कमतरता, सुमार बुद्धी या गोष्टी ठसठशीतपने दिसतात.

…मग हे अपयशी, आळशी, कामचुकार सहकारी, आपल्या हुशार सहकार्‍यावर जळायला लागत्यात.. बेक्कार नफरत करायला करत्यात.. मग त्याची नाहक बदनामी सुरू होते.. कायबी करून त्यानं झुकावं, त्याला त्रास व्हावा यासाठी जीवाचं रान करत्यात.. त्याला पुरस्कार वगैरे मिळू नये म्हनून वरपर्यन्त फिल्डींग लावत्यात…अशांना सडेतोड उत्तर देनारा एखादा जिगरबाज असतो, पन तसा एखादाच. लै जन बिचारे निराश होत्यात.. टॅलेन्टेड, तडफदार, कर्तव्यदक्ष मानसांना शाबासकी, प्रोत्साहन मिळन्याऐवजी त्यांचा अपमान होऊ लागला.. खचवन्यासाठी प्रयत्न होऊ लागले.. तर त्यांच्या कार्यक्षमतेवर लै लै लै बेक्कार परीनाम होतो भावांनो. ते डिप्रेशनमध्ये जात्यात.. ‘काय उपयोग या प्रामानिकपनाचा?’ असं वाटून हतबल होत्यात.. अशावेळी तुकोबाराया त्यांच्या मदतीला धावून येतो… त्यो म्हन्तो ‘आरं वाघांनो, तुम्ही कोल्ह्याकुत्र्यांकडं नका लक्ष देऊ’ :

“भुंकती ती द्यावीं भुंको । आपण त्यांचें नये शिकों ।।
भाविकांनीं दुर्जनांचें । मानूं नये कांहीं साचें ।।
होईल तैसें बळ । फजीत करावे ते खळ ।।
तुका म्हणे त्यांचें । पाप नाहीं ताडणाचें ।।”

…आपल्यावर जे भुंकतात त्यांना खुशाल भुंकू द्यावं, आपण त्यांचं शिकू नये.
…सज्जन-सत्वशील माणसांनी दुर्जनाची काहीही चिखलफेक खरी मानू नये.
…जेवढी असेल तेवढी ताकद एकवटून, अशा दुष्टांची फजिती करावी.
…शेवटी तुका म्हणे – अशा विघ्नसंतोषी दुर्जनांना सणसणीत फटके दिले तरी त्याचं पाप लागत नाही.

…हाय का नाय आपला तुकोबाराया डॅशिंग हिरो ! कुनी विघ्नसंतोषी बांडगुळ लैच ‘दिमाग का दही’ कराय लागलं तर सरळ चार मुस्काडात ठिवून द्या, आसं सांगनारा मानूस साधासुधा आसंल का? तुमाला सांगतो, त्याकाळात बी ट्रोलींग करनार्‍या भुरट्यांचा हैदोस होता. सोत्ता काय करायचं न्हाईच, पन प्रामानिकपने चांगलं काम करनार्‍याचा पाय वढायचा..चिखलफेक करायची.. त्यानं हतबल होऊन काम सोडावं अशी परीस्थिती निर्मान करायची.. त्याला बदनाम करायचं..त्याच्या नसलेल्या चुका शोधून शोधून दाखवायच्या..
शाहरूखनं दुवा मागीतली की म्हनायचं थुकला..
किरन माने अन्यायाइरूद्ध पेटून उठला की म्हनायचं याला प्रसिद्धी पायजे…
कुनाल कामरानं हसत-हसवत लंगोटाला हात घातला की म्हनायचं याचा शो बंद करा, याला बॅन करा…
मुनव्वर फारूकी विनोदातनं भवतालच्या असहिष्णूतेचं विदारक सत्य मांडायला लागला की म्हनायचं याला आयुष्यातनं उठवा… त्याला जेलमधी टाका..
आरं काय चाललंय काय भावांनो? यशस्वी – लोकप्रिय कलावंतांना छळन्यात विकृत कसला आनंद मिळतो या भंगारांना?? एखाद्याची क्रिएटिव्हीटीची ऊर्मी नष्ट कशी हुईल हे चिंतन्यातच जन्म जातो का काय ह्यांचा???

…पन भावांनो, हे इसरू नका की अशा त्रासातनंच तावून-सुलाखून छ. शिवराय घडले. ठोक्याला प्रत्यूत्तर म्हनून ठोका दिला. छत्रपती संभाजीराजेंच्या अफाट ताकदीचा, बुद्धीचातुर्याचा मत्सर करून त्यांच्याशी गद्दारी करू पहाणार्‍या अण्णाजी दत्तो प्रभुणीकर, बाळाजी आवजी चित्रे, सोमाजी दत्तो प्रभुणीकर, हिरोजी फर्जंद अशा जळकुट्या घातकी सहकाऱ्यांना पकडून शंभूराजेंनी हत्तीच्या पायाखाली दिले ! कारण तुकोबारायाचा सल्ला होता – “तुका म्हणे त्यांचें.. पाप नाहीं ताडणाचें !!”

…जळकुट्या, मत्सरी वृत्तीच्या विकृत लोकांनी आजकाल भवताली उच्छाद मांडलाय… आपन आपला भलेपनाचा, मानुसकीचा, प्रामानिकपनाचा, सत्याचा, कष्टाचा मार्ग सोडायचा नाय.. ‘भुंकती ती द्यावीं भुंको’. रस्त्यावरची बेवारशी कुत्री कितीबी भुकूद्या, हत्ती आपल्या धुंदीत चालतच र्‍हातो भावांनो. कुत्री ‘प्रोफाईल लाॅक’ करून, लांबून-लांबून पाक जीव खाऊन भुकत्यात. सगळे ‘फेक अकाऊंट’बहाद्दूर असत्यात. भेकड. आपल्या तालात आनि आपल्या चालीत चालनार्‍या हत्तीच्या जवळ जायचा दम नसतो त्यांच्या छातीत ! त्या हत्तीसारखं चाला भावांनो… एखांदा भुकत-भुकत लैच घुसायला लागला, तर सोंडंत उचलून गरागरागरा फिरवून भिर्रर्रर्रर्रर्र करुन द्यायचा फेकून लांब… तुकोबारायानंच सांगीतलंय का नाय… मग? सुट्टी नाय द्यायची… लढायचं.

ठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठल

Team Global News Marathi: