महिलांवर अत्याचार करणारी सैतानी वृत्ती मोडून काढलीच पाहिजे – उद्धव ठाकरे

 

मुंबई | आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आपण शिवरायांना मानतो. आपण झाशीच्या राणींचाही उल्लेख करतो. पण समाजात महिलांना अनेक विचित्र अनुभव येतात. महिलांना हे अनुभव येऊच नये… त्यातही शिवरायांच्या महाराष्ट्रात तर येऊच नाही यासाठी आपण सजर राहिलं पाहिजे. महिलांवर अत्याचार करणारी सैतानी वृत्तीच मोडून काढली पाहिजे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते निर्भया पथकाचं उद्घाटन पार पडलं. अभासी पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिसांचं अभिनंदनही केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी महिलांवर होणाऱ्या अत्याचारावरही भाष्य केलं. महिला कुठेही कमी नाहीत. त्या प्रगतीच्या दिशेने घोडदौड करत आहेत. मात्र समाजातील काही घटनांमुळे त्या असह्य होतात. एखादी घटना घडते, दुर्घटना घडते अन् हल्लकल्लोळ माजतो.चर्चा होते आणि पुन्हा वातावरण शांत होते.

मात्र या घटना घडूच नये. अशा घटना घडल्या तर आरोपींचा तिथल्या तिथे बंदोबस्त झाला पाहिजे. त्यासाठीची यंत्रणा आज आपण प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून सुरू करत आहोत ही अभिमानाची गोष्ट आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Team Global News Marathi: