विरार | महिला रिक्षाचालकाकडे शरीर संबंधासाठी मुलींची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये समोर आला आहे. ही मागणी करणारा शिवसेनेचा स्थानिक पदाधिकारी असल्याचं समोर आलं आहे. या प्रकारानंतर महिला रिक्षाचालकाने भररस्त्यात या शिवसैनिकाला चपलेने बडवून काढलं आहे.
जितू खाडे असं या शिवसैनिकाचं नाव असून तो विरारमध्ये शिवसेनेच्या विभाग प्रमुख पदावर काम करत असल्याची माहिती समोर येत आहे. जितू खाडेने महिला रिक्षाचालकाकडे शरिर संबंधासाठी मुली पाठवण्याची मागणी केली. ही मागणी ऐकताच संतापलेल्या रिक्षा चालकाने गुरुवारी दुपारी भररस्त्यात या शिवसैनिकाला चांगलाच चोप दिला.
या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आरोपीने काही काळानंतर घटनास्थळावरुन पोबारा केल्यानंतर महिला रिक्षाचालकाच्या तक्रारीवरुन विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे स्थानिक महिला रिक्षाचालकांकडून संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे सदर बातमी प्रसार माध्यमांवर येताच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहित स्थानिक नेत्यांनी दिली आहे.