“मुस्लिम कार्यकर्ता असेल तर दाऊदचा माणूस म्हणण्याची सवय”- शरद पवार

 

मुंबई | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी करण्यात येत आहे.जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी दाखल झालं होतं.

त्यानंतर नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनाही चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते.दरम्यान, नवाब मलिकांची चौकशी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर जमले होते. त्यांनी तिथे जोरदार घोषणाबाजीही केली.

नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात. त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल अशी आम्हाला खात्री होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.शरद पवार यांनी म्हटलं, “त्यांनी कोणती केस काढली आहे? नवाब मलिक यांच्या वरती कोणत्या प्रकरणात कारवाई केली गेली आहे याबाबत मला माहिती नाही. काही झालं विशेषतः कोणी मुस्लिम कार्यकर्ता असेल तर दाऊदचा माणूस आहे म्हणायची सवय आहे. त्याच्यात काही नवीन नाही.

Team Global News Marathi: