लग्नात आई नववधूला बाळकृष्ण का देते ?..त्यामागील शास्त्र वाचून तुम्हीही अवाक व्हाल..!

लग्नात आई नववधूला बाळकृष्ण का देते ?..त्यामागील शास्त्र वाचून तुम्हीही अवाक व्हाल..!

लग्नाचे सगळे विधी आटोपले. वरात निघायच्या वेळी आईने हळूच तिच्या हातात बाळकृष्ण दिला आणि “कुणालाही दिसू न देता तुझ्या बॅग मध्ये ठेवून दे”, असे ती कुजबुजली.

तिनेही काहीही न कळून तो ईवला परंतु वजनदार बाळकृष्ण घाईघाईत आपल्या पर्स मध्ये सरकवला. त्या बाळकृष्णाचे क्षणभर जे दर्शन तिला घडले, हाताला त्याचा जो स्नेहस्पर्श लाभला तो बराच वेळ तिच्या मनात रेंगाळत होता.

का दिला आईने आपल्याला बाळकृष्ण? का देतात लग्नात मुलीला बाळकृष्ण? आणि तोही लपून?

कृष्ण म्हणजे जगद्गुरूचे संपूर्ण रूप ! कृष्ण म्हणजे संपूर्ण पुरुष ! सोळाहजार एकशे आठ स्त्रियांचा पती. तुरुंगात बंदिस्त सोळाहजार स्त्रियांना समाजात मान मिळावा म्हणून त्यांना सन्मानाने पत्नीपद देणारा युगपुरुष !

सुभद्रा आणि द्रौपदी या भगिनींचा पाठीराखा. द्रौपदीने किमती वस्त्राची चिंधी कृष्णाच्या जखमेला बांधली त्याला कायम स्मरून वस्त्रहरणात तिची लाज राखणारा भ्राता. देवकीचा नंदन, यशोधेचा कान्हा. वासुदेवाचा लाडला, नंदराजाचा दुलारा. गोप-गोपिकांचा साथी. राधेचा परमप्रिय!

राधा ही कृष्णाचे स्रीरूप तर कृष्ण हा राधेचे पुरूषबिंब. कोवळा, नटखट, अचाट पराक्रमी आणि जीवनाचे सार सांगणाऱ्या गीतेचा रचियेता.

कृष्णाच्या जीवनाचे प्रत्येक पैलू कर्तव्याशी निगडित. म्हणून बाळकृष्ण देतात का लग्नात मुलीला? पण लपून का देतात ?

मनात विचारांचे असे अनेक आवर्तन उठत असतानाच तिला पायातले जोडवे टोचत असल्याची जाणीव झाली. “आई ग फार दुखतायेत बोटं”, ती कळवळून उदगारली.

“होईल सवय” आई घाईघाईत उत्तरली.

आईने उत्तर देताना नजर चोरली का तिला उगाचच वाटून गेले. आता या बोचण्याची, टोचण्याची, व्रणाची तुला सवय करायला हवी असे काहीसे आईला सुचवायचे होते का? आणि मग या दुखणाऱ्या सलात आपला सहभागी कोण? लपवलेला बाळकृष्ण?

आता प्रत्येक गोष्ट निमूट सोसायची. योग्य तिथे लढायचे, निष्काम वृत्तीने काळ काम वेगाचे गणित मांडायचे हेच कृष्णाचे गीतारहस्य का?

पुढच्या दैनंदिन जीवनात तिला पदोपदी कृष्ण जाणवू लागला. लग्नात शृंगार असावा वासना नसावी म्हणजेच राधेचा कृष्ण. एकमेकांना मधूमोहिनी घातल्यासारखे एकमेकांत रत रहावे म्हणजेच कृष्णलीला.

लग्नानंतर अंगणात संतती खेळावी. त्या बालरूपाने, बाललिलांनी आपण, कुटुंबीय आनंदित व्हावे म्हणजेच कृष्णाचा नटखट कारभार.

पुढे कृष्णाने विद्यार्जनासाठी गुरुकुली जावे म्हणजेच आईपासून मुलांचे विलग होऊन वेगळ्या विश्वात भ्रमण करण्यासाठी तयार होणे.

संसारात कधी आपल्याच माणसांच्या विरोधात जाऊन घेतलेले योग्य निर्णय खंबीरपणे तग धरून निभावणे म्हणजेच गीतामहात्म्य!

तिला हे सगळे समजायला जीवनाचा प्रत्येक टप्पा समर्थपणे ओलांडावा लागला. पावलोपावली कृष्ण कळायला लागला. वेळ आली की सगळा राग, सगळा त्रागा निघायचा तो कृष्णावरच आणि मग हलकेच आधारायचाही तो कृष्णच !

कृष्णजन्माच्या दिवशी आपल्या बालगोपालांना मध्यरात्रीपर्यंत जागून सुंठवडयाचा प्रसाद खाताना पाहिले की याही पिढीत कृष्ण स्त्रवत असल्याचा मुलायम भास तिला व्हायचा.

आईने लग्नात कृष्ण दिला आणि अगदी त्या क्षणापासून पदोपदी गृहीत धरलेली आई उमजायला लागली. तिचे देवकीरूप, तिचे यशोधारूप जाणवायला लागले. आईसोबतच राधा, मीरा, रुख्मिणी, सत्यभामा तर उमगल्याच पण कुब्जाही आकळायला लागली.

कडाडत्या थंडीत कुणीही उठले नसलेल्या अंधारात कुब्जा आपले कुरूप शरीर सांभाळत यमुनेच्या पाण्यात मनसोक्त कृष्णपावारवाचा लेप माखून घेत आलेल्या भोगासाठी नव्याने सिद्ध व्हायची.

संसार असा तल्लीनतेने करायचा आणि वेळ आली की विरक्त व्हायचे हाही धडा कृष्ण सानिध्याचाच. संसार ही केवळ कृती नसून हरीने दर्शवलेली वृत्ती आहे. प्रीतिसौख्याचा, जीवनसमृद्धीचा निर्मळ महामंत्र आहे.

महामंत्र, गुरुमंत्र कानातच गुप्तरीत्या सांगितल्या जातो म्हणूनच कदाचित लग्नात आई मुलीला हळूच बाळकृष्ण सोपवत असेल, नाही का ?

ग्लोबल न्युज नेटवर्क: