सध्या संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे, त्यात रुग्णसंख्या सुद्धा झपाटयाने वाढताना दिसत आहे, आज वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र आज अनेक राज्यांमध्ये मोठया प्रमाणात लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण मोहिमेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी भित्तीपत्रके दिल्लीत चिटकवण्यात आलेली आहे.
याच पार्श्वभूमीवर भित्तीपत्रके चिकटवल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी शंभर जणांना अटक केली. त्यात ई-रिक्षाचालक (३०), शाळा सोडलेला तरुण (१९), लाकडी चौकटी बनवणाऱ्याचा (६१) समावेश आहे. विशेष शाखेने दिल्ली पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांना भित्तीपत्रकाबद्दल कळवल्यानंतर १२ मे रोजी दिल्लीत लोकांना अटक करण्यात आली.
चिटकवण्यात आलेल्या पोस्टरवर असा मजकूर लिहिला होता : “मोदी जी हमारे बच्चों की व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया?” पोलिसांनी ज्यांंना अटक केली ते एक तर रोजंदारीवरील मजूर आहेत किंवा बेरोजगार युवक. हे मजूर आणि बेरोजगार युवकांनी ही भित्तीपत्रके चिकटवली, फलक लावले. ही भित्तीपत्रके किंवा फलकांवरील मजकुराबद्दल किंवा त्यात गुंतलेल्या राजकारणाची त्यांना काहीही कल्पना नव्हती. अटक झालेला राहुल त्यागी म्हणाला की, “आम आदमी पक्षाचे नगरसेवक धीरेंद्र कुमार यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने मला २० फलक ११ मे रोजी दिले व कल्याणपुरीत ते लावण्यासाठी ६०० रुपये देण्याचे आश्वासन दिले.
आता याच पोस्टरवरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीदेखील तेच पोस्टर शेअर केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मलादेखील अटक करा. यासोबत राहुल गांधी यांनी त्या पोस्टरचा फोटोदेखील शेअर केला आहे आणि विचारले आहे की, मोदीजी, आपण आमच्या मुलांच्या लसी विदेशात का पाठविल्या. त्यांनी हेच पोस्टर आता प्रोफाईल फोटो म्हणून ठेवले आहे.