नवी दिल्ली: कोरोना संकटावर मात करण्यासाठी लस विकसित करण्याचे प्रयत्न जगभर सुरू आहेत. अमेरिकेतील फायझर आणि मॉडर्ना या दोन कंपन्यांनी त्यांच्या लस लवकरच बाजारात येतील, असे संकेत दिले आहेत. यामुळे जगभर आशादायी वातावरण झाले असताना जागतिक आरोग्य संघटनेने काळजी वाढवणारा नवा बॉम्ब टाकला.
लस मिळाली तरी कोरोना संकट संपणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस म्हणाले. टेड्रोस हे मूळचे इशिओपियाचे आरोग्यमंत्री आहेत. चीनच्या पाठिंब्यामुळे त्यांना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुखपद मिळाले. एका विकसनशिल देशातील आरोग्य मंत्र्याला संधी मिळाल्यास अनेक गरीब देशांचे प्रश्न आरोग्य संघटना व्यवस्थित हाताळेल, या आशेतून अनेक विकसनशिल देशांनी टेड्रोस यांना पाठिंबा दिला होता. पण प्रमुखपद मिळाल्यापासून ते सतत चीनचे कौतुक करण्यात गुंतल्याचे चित्र आहे.
कोरोना संकट वाढत असताना जगाला सावध करण्यात संघटना कमी पडली, असाही आरोप अनेकांनी केला. पण या आरोपाला उत्तर देण्याऐवजी चीनच्या नेत्यांच्या संपर्कात राहण्यात टेड्रोस यांनी धन्यता मानली. कोरोनाप्रश्नी चीनला जाब विचारण्याऐवजी आफ्रिकेतून कोरोना आणखी पसरेल, असे सांगणे त्यांनी पसंत केले. आता त्यांनी लस मिळाली तरी कोरोना संकट संपणार नाही, असे वक्तव्य केले आहे. टेड्रोस यांच्या या वर्तनामुळे त्यांचे वक्तव्य खरे मानावे की चीनच्या सांगण्यावरुन ते बोलत आहेत, असे समजावे हा नवा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
अनेक विषाणू हळू हळू आपले रुप बदलतात. त्यांच्या क्षमतेते बदल होत जातो. मानवी उत्क्रांतीप्रमाणेच नैसर्गिकरित्या हा प्रकार घडतो. कोरोना या आजारासाठी कारणीभूत असलेल्या विषाणूने रूप आणि क्षमता यात बदल केला तर वेगवेगळ्या औषधांच्या मदतीने तसेच वेगवेगळ्या लशींचे कमी-जास्त डोस देऊन कोरोना रुग्णांवर उपचार करावे लागतील.
व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणतात. प्रत्येक व्यक्तीचे आजारांशी लढण्याचे सामर्थ कमी जास्त असते. याच कारणामुळे एखाद्याला कोरोना झाला तरी त्याच्या रोगप्रतिकारक क्षमतेचा विचार करून कोणकोणत्या औषधांद्वारे आणि लशींद्वारे उपचार करावे याचे नियोजन करावे लागेल. हे नियोजन अनुभवी डॉक्टर रुग्णाच्या तब्येतीवर लक्ष ठेवून करू शकतो.
याच कारणामुळे कोरोनावरील एखादी लस विकसित झाली तरी संकट संपणार नाही. वेगेवेगळ्या देशांमध्ये तिथल्या वातावरणाचा आणि रुग्णांचा विचार करुन कोरोनावर मात करणारी लस विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जगाला अशा वेगवेगळ्या क्षमतेच्या लशींचे पर्याय विकसित करावे लागतील. यानंतर रुग्णाला तपासून औषध आणि लशींच्या योग्य पर्यायांची निवड करुन तसेच त्यांचे प्रमाण रुग्णाच्या तब्येतीनुसार निश्चित करुन उपचार करावे लागतील. ही प्रक्रिया डॉक्टरांशिवाय पार पाडता येणार नाही, याच कारणामुळे कोरोनाची एखादी लस विकसित झाली तरी कोरोना संकट संपणार नाही.
कोरोना या संकटासोबत जगाला इतर आजारांप्रमाणेच दीर्घकाळ संघर्ष करावा लागेल. डॉक्टरांच्या मार्गदर्शनात रुग्णांवर उपचार करणे हाच माणसाच्या हाती असलेला पर्याय आहे. लस आणि औषधांसाठी संशोधन होत आहे. ते यापुढेही होत राहील. पण लस सापडली म्हणजे कोरोना संकट संपेल, असा विचार करणे योग्य होणार नाही. वास्तवाचे भान ठेवून दीर्घकाळ काम करत राहावे लागेल. लस मिळाली तरी कोरोना संकट संपणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस म्हणाले.
आतापर्यंत जगात ५ कोटी ५२ लाख ६९९ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी १३ लाख ३० हजार १०४ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगात अद्याप १ कोटी ५५ लाख २८ हजार ४५८ कोरोना रुग्ण आहेत. कोरोनाचे संकट संपलेले नाही. नागरिकांनी मास्क घालावे, सोशल डिस्टंस पाळावा, वैयक्तिक स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे; असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी सांगितले.