बारामती : दिवाळीच्या सणाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असतानाच राजकीय पटलावर सक्रिय असणारी मंडळीही यात मागे राहिलेली नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणातील मातब्बर घराणे असलेल्या बारामतीच्या पवार कुटुंबात ही यंदा दिवाळी पाडवा आणि भाऊबीज उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.शरद पवार यांच्या कुटुंबाच्या दिवाळी सेलिब्रेशनचे काही क्षण सर्वांच्याच भेटीला आले आहेत.
सुप्रिया सुळे यांनी या क्षणांची झलक सर्वांच्या भेटीला आणत आपल्या कुटुंबानं दिवाळी पाडवा, भाऊबीज कशी साजरा केली हे दाखवून दिलं.त्यांनी त्यांच्या फेसबुकवर हे फोटो शेअर केले आहेत. शरद पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी पवार कुटुंबातील सर्व मंडळी एकत्र जमून त्यांनी इथं हा सण साजरा केला.
(2/2) pic.twitter.com/pxsVmdSvEk
— Supriya Sule (@supriya_sule) November 16, 2020
शरद पवारांचं प्रतिभा पवारांनी औक्षण केलं, अजित पवार यांनाही त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी ओवाळलं. सुप्रिया सुळे यांनीही दिवाळी पाडव्यानिमित्त पती सदानंद सुळे यांच औक्षण केलं. राष्ट्रवादीचे लोकप्रिय नेते रोहित पवार यांनाही पत्नी कुंती पवार यांनी ओवाळलं.
दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी राज्यातील अनेक कार्य़कर्ते पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी बारामतीची वाट धरतात. पण, यंदा कोरोनाच्या संकटामुळं ही भेट घडलेली नाही. परिणामी अत्यंत साध्या पद्धतीनं पण, पारंपरिकपणा जपत हा सण साजरा करण्यात आला. तर अजित पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, अभिजित पवार या बंधूंना त्यांच्या भगिनी विजयक पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांच्या सात बहिणी नी ओवाळले.