मुख्यमंत्र्यांवर टीका करताना फडणवीस-पाटलांनी भान ठेवावे – विजय देवणे

कोल्हापूर : राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. यानंतर विरोधात बसलेल्या भारतीय जनता पक्षाने अनेकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

याच मुद्द्यावरून आता शिवसेना कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष विजय देवणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना इशारा दिला आहे. ‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करताना भान ठेवावे. ठाकरे यांच्यावरील टीका शिवसेना सहन करणार नाही. शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून भाजपला उत्तर देतील असा दम देवणे यांनी दिला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी मुख्यमंत्री ठाकरे यांना उद्देशून टीका केली होती. मुख्यमंत्र्यांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही. ते अपघाताने मुख्यमंत्री बनले आहेत, असं पाटील म्हणाले होते. त्या टीकेला शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी उत्तर दिले आहे.

पुढे बोलताना देवणे म्हणाले की, भाजपची अवस्था ही पाण्याबाहेर असलेल्या माशासारखी झाली आहे. सत्तेविना भाजपची मंडळी तडफडत आहेत. शिवसेनप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरुन भाजपचे महाराष्ट्रात राजकारण सुरू झाले होते याचे त्यांनी स्मरण ठेवावे. प्रबोधनकार ठाकरे व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समाजकारण, राजकारणाचे बाळकडू मिळाले आहेत असे देवणे यांनी बोलून दाखविले आहे.

Team Global News Marathi: