अजितदादा आपला व्हीव्हीआयपी सूट अमित शाहांसाठी उपलब्ध करून देतात तेव्हा…!

अजितदादा आपला व्हीव्हीआयपी सूट अमित शाहांसाठी उपलब्ध करून देतात तेव्हा…!

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठेपणा आज पुन्हा एकदा पाहण्यास मिळाला आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह पुण्यात मुक्कामी आहे. पण, ऐनवेळी त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था न झाल्याचं समोर आलं. अजित पवारांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी तातडीने सर्किट हाऊसमधील आपला व्हीव्हीआयपी सूट अमित शहा यांच्यासाठी उपलब्ध करून दिला.

भाजप नेते राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची एकही संधी सोडत नाही. पण, राजकारणात कायम कुणीच कुणाचा शत्रू नसतो हे पुन्हा एकदा अजित पवार यांनी दाखवून दिले. त्याचं झालं असं की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आज ते पुण्यात मुक्कामी आहेत. पुण्यातील क्विन्स गार्डन येथील व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊस आहे.

या गेस्ट हाऊसमध्ये अमित शाह यांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाने चाचपणी केली. पण, कोणताही व्हीव्हीआयपी सूट उपलब्ध नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. या व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासाठी सूट राखीव असतो. तसंच प्रीमिअम सूट हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासाठी असतो. अजितदादा शनिवारी आणि रविवारी पुण्यात मुक्कामी असल्यामुळे त्यांच्या नावावर सूट बूक होता.

प्रशासनाने अमित शाह यांच्यासाठी सूट उपलब्ध नसल्याची माहिती अजित पवार यांच्या कानी घातली. अजित पवार यांनी क्षणाचा विलंब न करता अमित शाह यांच्यासाठी आपला व्हीव्हीआयपी सूट उपलब्ध करून दिला. अजित पवार यांनी तातडीने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रशासनानेही सुटकेचा श्वास सोडला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: