राजकीय हवा कशीही असली तरी, मलबार हिलची हवा चांगलीच; मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी –

राजकीय हवा कशीही असली तरी, मलबार हिलची हवा चांगलीच; मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी –

मुंबई : ‘जुनं ते कायम ठेवून आपण ही वास्तू नव्याने उभी केली आहे. या वास्तूचं सौंदर्य अप्रतिम असंच आहे. पुन्हा एकदा नव्या दमाने ही वास्तू उभी आहे. या परिसरातील हवा खूप थंड असते. राजकीय हवा कशीही असू द्या. पण मलबार हिलची हवा चांगली असते’, अशी टोलेबाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राजभवनातील नव्या दरबार हॉलचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आदी मान्यवरांसह आघाडीतील अनेक नेते उपस्थित होते.

नव्या वास्तूचं सौंदर्य अप्रतिम असं आहे. तुम्ही पुन्हा एकदा नव्या दमाने ही वास्तू उभी केली आहे. कदाचित हे देशातील सर्वोत्तम राजभवन असेल. या वास्तुला ५० एकरची जागा लाभली आहे. एका बाजूला अथांग समुद्र आहे. दुसऱ्या बाजूला गर्द हिरवीगार झाडी आहेत. या परिसरातील हवा थंड असते. राजकीय हवा कशी असू द्या. पण मलबार हिलची हवा चांगली असते, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. या आवारात मोरही आहेत. विषारी नागही आहेत. सर्प मित्रांनी नागांचे पकडलेले फोटो आपण पाहतच असतो, असंही ते म्हणाले.

या संपूर्ण वास्तूचं वर्णन करायचं म्हणजे जुना वारसा कायम ठेवून आपण आधुनिकीकरणाकडे जात आहोत. या वास्तूने ऊन, वारा आणि पावसाचा तडाखा सोसला आहे. त्यामुळे वास्तूची थोडी नासधूस होते. म्हणून वास्तूची रचना कायम ठेवून ही वास्तू आपण जपली आहे. आपण जुन्याची मोडतोड करून नव्याकडे जात असतो. पण आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. आपण मॉडर्न तर आहोतच. मॉडर्न व्हायचं आहे. पण संस्कृतीही जपायची आहे. पारतंत्र्याच्या घडामोडी बघणारी वास्तू आता लोकशाहीच्या सशक्त अशा पुढच्या घडामोडी पाहण्यासाठी नव्या दमाने सज्ज झाली आहे, असं ते म्हणाले. नव्या वास्तूत चांगल्या घटना घडतील. आनंददायी घटना घडतील अशी अपेक्षा करतो, असंही ते म्हणाले.

आम्ही राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन यायचो, पण रोज नाही; विरोधकांना टोला

आम्ही विरोधी पक्षात होतो तेव्हा राज्यपालांची भेट घेण्यासाठी आणि आमची गाऱ्हाणी त्यांच्या कानावर घालण्यासाठी वर्षातून एक किंवा दोन वेळी राजभवनावर यायचो पण रोज नाही. असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची सारखी सारखी भेट घेणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला आहे.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधताना म्हटलं आहे की, राजभवनातील दरबार हॉलचे उद्घाटन करण्यासाठी उपस्थिती लावली आहे. मुख्यमंत्री म्हणून मला स्वतःला वैयक्तिक आनंद होत आहे. याचे कारण असे की दरबार हॉल राजभवन आम्हाला नवीन नाही आहे. आम्ही विरोधी पक्षात होतो तेव्हा वर्षातून एकदा किंवा दोनवेळा शिष्टमंडळ घेऊन येत होतो. अगदी रोज काही येत नव्हतो परंतु एखाद दुसऱ्या वेळी येत होतो. राज्यपालांना भेटायचो त्यांच्या कानी आमच्या काही व्यथा आणि मागण्या घालत होतो. आजसुद्धा आवश्यकता असेल तर आमचा संवाद सुरुच असतो. पण विशेष म्हणजे या वास्तुमध्ये ज्या अनेक घटका पाहिल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

याच वास्तूमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाचे अनावरण

१०० वर्ष गेली पण या १०० वर्षाच्या काळात जसं पारतंत्र्य पाहिले स्वातंत्र्याच्या काही घडामोडी गेल्या आहेत. परंतु एका गोष्टीचे विशेष अभिमान वाटतो तो म्हणजे याच वास्तूमधून ३० एप्रिल १९६० रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी त्या काळी संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाचे जे औपचारिक अनावर केलं त्याबद्दल विशेष अभिमान आणि आनंद वाटतो अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.

राष्ट्रपतींकडून मराठीतून महाराष्ट्राचा गौरव

गेल्या साडेचार वर्षात मी १२ वेळा महाराष्ट्रात आलो आहे. महाराष्ट्राशी माझा ऋणानुबंध राहिला आहे, असं सांगतानाच महाराष्ट्राचा अर्थ सांगायचा झाला तर भाषा विज्ञानाकडे जायची गरज नाही. तुमचे हृदयच महाराष्ट्राचा अर्थ सांगेल. आमचा महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र. अर्थातत भारताचं महान राज्य आणि क्षेत्र, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्राचा गौरव केला. महाराष्ट्राचा गौरव करताना महाराष्ट्राचा नेमका अर्थ काय हे त्यांनी मराठीतून सांगितला.

राजभवनातील दरबार हॉलचे लोकार्पण केल्यानंतर ते संबोधित करत होते. महाराष्ट्राच्या महानतेचे अधिक आयाम आहेत. त्यांचं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. महाराष्ट्रातील केवळ महापुरुषांची नावे घेतली तरी यादी कमी पडेल. छत्रपती शिवाजी महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेशवर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हेडगेवार आदी अनेक महापुरुष महाराष्ट्राने दिले. विचारधारा वेगळी असेल पण मानवजाताची उत्कर्ष करणे हाच सर्वांचा उद्देश राहिला आहे. महाराष्ट्राची भूमी संताची आहे, अन्यायाविरोधात लढणाऱ्या वीरांची धरती आहे. देशभक्त आणि भगवत भक्तांची आहे. महाराष्ट्र हे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. अजिंठा ऐलोरा लेण्या आपल्याला समृद्ध करतात. महाराष्ट्रात प्रतिभा आणि निसर्गाचा विलोभनीय संगम आहे. इथलं आदरतिथ्य प्रसिद्ध आहे, अशा शब्दात रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्राची महती विशद केली.

यावेळी राष्ट्रपतींनी गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांचंही स्मरण केलं. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यावर मला थोडी सुन्नता जाणवतेय. आठवड्याभरापूर्वी आपण लतादीदींना गमावलं. त्यांचं संगीत अजरामर आहे. त्यांचं संगीत आणि स्वभाव कायम स्मरणात राहील. मला त्यांचा स्नेह लाभला. त्यांचं जाणं दुर्देवी आहे, असं राष्ट्रपती म्हणाले.

दरबार हॉलच्या हेरिटेज इमारतीचं वैशिष्ट्ये कायम ठेवून ही इमारती बांधली गेली. आधुनिकतेचा अंगीकार करून ही नवी वास्तू बांधण्यात आली. राष्ट्रपती भवनाप्रमाणेच हे राजभवन सामान्यांच्या आकांक्षाचं प्रतिक झालं आहे. याचं वर्तमान आणि भविष्य महाराष्ट्राच्या गौरवाचं प्रतिक राहिलं आहे. अडीच वर्षापूर्वी मला राजभवनाच्या अंडरग्राऊंड म्युझियमचं उद्घाटन करता आलं. राजभवन जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील लोकांच्या आकांक्षेचं प्रतिक आहे, असं ते म्हणाले.

हे राजभवन भारताचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा उत्सव म्हणून आपण पाहतो. राजभवन हे लोककल्याणचं केंद्र ठरेल. दरबार हा शब्द राजेशाहीशी संबंधित आहे. मात्र आज दरबार या शब्दाचा संबंध लोकशाही निगडीत झाला आहे. दरबारच्या व्यवस्थेत व्यक्तिगत आणि गोपनीय चर्चा होत नाही. जे काही होतं ते सर्व पारदर्शक होतं. जनतेच्या हिताचं होतं. नव्या संदर्भाने नवा दरबार हाल नवा भारत, नव्या महाराष्ट्राच्या जीवंत लोकशाहीचं प्रतिक आहे, असं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. माझ्या वैयक्तिक आयुष्यात राजभवनाचा महत्त्वाचा रोल राहिला आहे. मोरारजी देसाई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांचा शपथविधा याच राजभवनात पार पडला. त्यावेळी मी त्यांचा खासगी सचिव होतो. मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, असं ते म्हणाले.

बाबासाहेबांच्या आजोळी जाणार

उद्या मी रत्नागिरीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजोळी जाणार आहे. आंबडवे हे बाबासाहेबांचे आजोळ आहे. तिथे जाऊन बाबासाहेबांच्या स्मारकावर पुष्प अर्पण करणार आहे. दोन महिन्यापूर्वी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर पुष्प अर्पण केलं होतं. 350 वर्षापूर्वी याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी देशप्रेमाची ज्योती प्रज्वलित केली होती, असंही त्यांनी सांगितलं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: