सतत आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रानौत लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिमाचल प्रदेशच्या मंडी या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत उमेदवार राहू शकते, अशा चर्चा सध्या सुरू आहेत. या मतदार संघाचे भाजप खासदार रामस्वरूप शर्मा यांचे या वर्षी मार्चमध्ये निधन झाले. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे.
लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली असून ८ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. मंडी लोकसभा जागेबरोबरच तीन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूकही ३० ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेश पोटनिवडणुकीसाठी धर्मशाळेत भाजपच्या निवडणूक समितीची बैठक होणार आहे. भाजपला मंडी सीटवरून कंगना रानौतला तिकीट द्यायचे आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही या उमेदवारांबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप कंगनाने निवडणूक लढवण्याची इच्छा उघडपणे व्यक्त केलेली नाही.
कंगना रानौत ही मंडी जिल्ह्यातील भांबला गावातील आहे आणि तिने आपले नवीन घर मनालीमध्ये बांधले आहे, जे मंडी लोकसभा मतदारसंघात येते. मंडीबरोबरच हिमाचलमधील फतेहपूर, जुबल कोथकाई आणि आर्की विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. या वर्षी माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या निधनानंतर आर्की जागा रिक्त झाली आहे. येथे जिंकलेल्या उमेदवारांच्या मृत्यूनंतर उर्वरित दोन जागाही रिक्त झाल्याचे सांगितले जात आहे.