‘दोन-तीन दिवसांत काय चमत्कार घडू शकतो?, हे फक्त राजन पाटीलच दाखवू शकतात…’ अजित पवार

अजित पवार म्हणाले, शिल्लक उसासाठी कारखान्यांना प्रतिटन 200 रु.

मोहोळ सिंचन योजना मार्गी लावू -अजितदादा पवार

मोहोळ मतदारसंघातील नव्या सिंचन योजनासाठी राजन पाटील आणि आ. यशवंत माने यांची आग्रही भूमिका आणि पाठपुरावा सुरू आहे.

अनगर : बाळराजे आणि अजिंक्यराणा पाटील यांनी या शेतकरी मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजन केले आहे. मी त्यांना दोन ते तीन दिवसांपूर्वी सांगितले होते की, सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील कल्याण आखाड्याच्या मेळाव्यासाठी मी येणार आहे. तेव्हा त्यांनीही म्हटले होते की, आम्ही शेतकरी मेळावा घेतो आणि दोन ते तीन दिवसांत काय चमत्कार घडू शकतो, हे फक्त राजनमालकच दाखवू शकतात, हे आपल्या सर्वांना या मेळाव्याच्या निमित्ताने दिसत आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजन पाटील (Rajan Patil) यांनी केलेल्या मेळाव्याच्या नियोजनाचे कौतुक केले.

मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नगरपंचायत झाल्याबद्दल आज (ता. ३० एप्रिल) कृतज्ञता आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन अनगरमध्ये करण्यात आले होते. त्या मेळाव्यास प्रचंड गर्दी झाली होती. तसेच नेटके नियोजन पाहून अजित पवार यांनी राजन पाटलांबरोरबच बाळराजे आणि अजिंक्यराणा यांचेही कौतुक केले.

 

ते म्हणाले की, जनतेचे प्रेम, लोकांचा भरभक्कम पाठींबा, जनतेचा नेतृत्वावर आणि नेतृत्वाचा जनतेवर असणारा विश्वास, यातूनच आजच्या मेळाव्यासारखं उदाहारण उभं राहतं. ते काय येरागबाळ्याचं काम नाही.

 

 

महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान होता कामा नये. यासाठीच येत्या एक मेपासून शिल्लक ऊस गाळप करण्यासाठी कारखान्यांना रिकव्हरी लॉस म्हणून प्रतिटन दोनशे रुपये देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतल्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. सोबतच वाहतुकीसाठी पन्नास किलोमीटर पेक्षा जास्त अंतरासाठी प्रतिकिलोमीटर पाच रुपये देण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले.

अनगर नगरपंचायतीच्या स्थापनेनिमित्त मोहोळ तालुका राष्ट्रवादीच्या वतीने कृतज्ञता आणि शेतकरी मेळावा आयोजित केला होता. यावेळी पवार बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार व संयोजक राजन पाटील,लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील, युवा नेते अजिंक्यराणा पाटील जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, आमदार बबनदादा शिंदे, यशवंत माने, निलेश लंके, संजय शिंदे, अमरसिंह पंडीत, राहुल पाटील, माजी आमदार दीपक सांळुखे, कल्याणराव काळे, संतोष वाबळे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, मोहोळ मतदारसंघातील नव्या सिंचन योजनासाठी राजन पाटील आणि आ. यशवंत माने यांची आग्रही भूमिका आणि पाठपुरावा सुरू आहे. यासाठी लवकरच मंत्रालयात जलसंपदामंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल.

मोहोळ सिंचन योजना मार्गी लावू

नव्याने जाहीर झालेल्या अनगर आणि मोहोळ नगरपंचायतीच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी येत्या आर्थिक वर्षातील निधी वाटपाच्या तरतुदीतून प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी देऊ. त्यातून नव्या इमारती उभारल्या जातील. येत्या 31 मार्चपर्यंत योग्यरीतीने खर्च केला तर पुढील आर्थिक वर्षात आणखी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून करून देऊ, असेही पवार म्हणाले.

सामाजिक न्यायकडून 12 कोटी

धनंजय मुंडे म्हणाले, अनगर ग्रामपंचायत काळापासून ते आजतागायत बिनविरोध होणारी ही ग्रामपंचायत राज्यात पहिले उदाहरण आहे. अनगर हे गाव ग्रामपंचायत असल्यापासून विकासाने समृद्ध असलेला परिसर म्हणून ओळखला जातो. आता नगरपंचायतीची स्थापना झाल्यामुळे यापुढील काळातही या भागातील विकासात्मक वाटचाल अशीच गौरवास्पद रित्या सुरू राहील असा मला विश्वास वाटतो. उपमुख्यमंत्री यांचे आदेश प्रत्येक मतदार संघाला दहा कोटी पर्यंतच्या निधी देण्याचे आदेश असताना सामाजिक न्याय विभागाकडून मोहोळ विधानसभा मतदार संघासाठी झुकते माप देऊन 12 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

प्रास्ताविकात राजन पाटील म्हणाले, गेली दहा वर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या मतदारसंघाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी जास्तीत जास्त निधी द्यावा. त्याद्वारे अजित पवार यांनी हा बॅक लॉक पूर्ण करावा. नव्या सिंचन योजना मंजूर करून त्यांना निधी द्यावा. अनगर येथे स्वतंत्र दुय्यम निबंधक कार्यालयाची उभारणी तसेच मोहोळ आणि अनगर नगरपंचायतीच्या अद्यावत इमारतीसाठी प्रत्येकी दहा कोटी रुपयांचा निधी द्यावा. गेली तीस वर्ष हा मतदारसंघ शरद पवार यांच्या विचारांनी राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. यापुढील काळातही पवार कुटुंबीयांकडून मार्गदर्शन आणि सहकार्याची अपेक्षा असल्याचेही मत पाटील यांनी व्यक्त केले.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: