त्यांना आम्हीच चितपट करणार -जयंत पाटलांचे फडणवीसांना आव्हान

पुणे : राज्यात सध्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सोबतच आगामी महानगरपालिका निवडणुकीची चर्चा सुरू झाली असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना आव्हाने देताना दिसत आहेत.मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी एकत्र लढण्याची चिन्हे असून भाजपला चितपट करण्याचा निर्धार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.ते आज पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आले होते.यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

 

उद्यापासून पुणे जिल्ह्यात निवडणुकीचा प्रचार सुरू होणार असून त्याचा आढावाही जयंत पाटील यांनी घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, राज्यात पाच जागांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. पाच ही जागांवर आम्ही निवडून येऊ. आम्ही तिन्ही पक्ष संयुक्त प्रचार करत आहोत. कोणी कुठे जायचे तसे ठरलेले आहे. देशात आर्थिक मंदीमुळे पदवीधरांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कोविडच्या आधी आर्थिक मंदी आली आहे. त्यामुळे त्यातून बाहेर काढणे गरजेचे आहे. आमचे सरकार ते करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

महापालिका निवडणुकीसाठी भाजपने मिशन मुंबई सुरू केले आहे.मात्र महापालिकेत भाजपची सत्ता येऊ देणार नाही, असे आव्हान जयंत पाटील यांनी दिले आहे. मुंबई महापालिकेत निवडणुकीत सर्वांनी एकत्रित आले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत स्थानिक स्तरावर निर्णय होईल. महापालिका निवडणूक अजून लांब आहे, भाजपने आतापासून सुरुवात केली तर त्यांना महत्त्व देऊ नका. त्यांना आम्हीच चितपट करणार आहे. देवेंद्र फडणवीस आता उठाबशा काढत असले, तरी त्यांना माहिती आहे त्यांचा पराभव होणार, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: