…यासाठी आम्ही मलिकांचा राजीनामा घेणार नाही; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले

पुणे :- पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचा परिसंवाद मेळावा प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. महापालिका निवडणुकीत आघाडीबाबत आधी उपमुख्यमंत्री आणि शहराध्यक्ष यांच्याशी चर्चा करेन. निवडणुका लढविताना आघाडी करायची की स्वतंत्रपणे लढायचे याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर होईल. मात्र, कार्यकर्त्यांनी कोणतीही परिस्थिती आली तरी लढण्याची तयारी ठेवावी, अशी सूचना त्यांनी केली.

युक्रेनमध्ये अडकेल्या विद्यार्थ्यांबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “जागतिक पातळीवर रशिया आणि युक्रेनच्या सीमारेषेवर युद्धाचे ढग जमायला लागल्यानंतर युक्रेनमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी जगातील सर्व देश प्रयत्न करत होते. त्यावेळी आपले केंद्र सरकारमधील नेते पाच राज्यांतील निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त राहिले. अनेक पालक आणि मुलांशी बोलणं सुरू आहे. दुर्दैवाने एकाचा  मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने या मुलांना वाचवण्यास उशीर केला आहे. केंद्र सरकारने मुलांना लवकरात लवकर मायदेशी आणण्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

 

यावेळी नवाब मलिकांच्या राजीनाम्याबाबतही पाटलांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही. रोज उठून मंत्र्यांमागे चौकशी लावली की आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ असं नाही. अनिल देशमुखांबाबत जे घडलं नाही, ते दाखवायचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा राजीनामा घेतला. परंतु आता आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही. नवाब मलिक यांच्याबाबत विधानसभेत  चंद्रकांत पाटील जी भूमिका मांडतील त्याला आम्ही तिथे योग्य उत्तर देऊ. तसेच किरीट सोमय्यांबाबत न बोललेले बरे, असेही ते म्हणाले.

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानाबद्दल ते म्हणाले की, “महाराष्ट्राचा इतिहास सर्वांना माहिती आहे. औरंगाबाद कोर्टानेदेखील निर्णय दिला आहे. त्यामुळे जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने अशा गोष्टी बोलणं टाळायला हवे.  अशी विधाने करणे योग्य नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, आज युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा नाहक बळी गेला. यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्ही सगळे सातत्याने केंद्र सरकारकडे विनंती करीत आहोत. युक्रेनमध्ये अनेकांची मुले अडकली आहेत, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावे.

 

शरद पवार यांनीदेखील मंत्र्यांशी आणि संबंधित  अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. ती आपली मुलं आहेत. त्यांना परत आणण्यासाठी पूर्ण ताकदीने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. दुर्दैवाने आपण भारताचा एक मुलगा गमावून बसलो आहे. ती घटना अतिशय दु:खद आणि मनाला वेदना देणारी आहे. त्यामुळे माझी केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे की, परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आपल्या मुलांना वाचवा, मग पब्लिसिटी करा, ही पब्लिसिटी आणि राजकारण करण्याची वेळ नाही.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: