आम्ही उद्यापर्यंत वाट बघू, संप मागे न घेणाऱ्यांवर कडक कारवाई करु

 

मुंबई | परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा यासाठी पगारवाढीची घोषणा केली. पण या पगारवाढीच्या घोषणेनंतरही कामगार संप मागे घेण्याच्या तयारीत नाहीत. एसटी महामंडळाचं जोपर्यंत सरकारमध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे. तर दुसरीकडे सरकारने पगारवाढीची घोषणा केल्यानंतरही जे कामगार उद्या सकाळपर्यंत कामावर रुजू झाले नाहीत त्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा परिवहन मंत्री आणलं परब यांनी दिला आहे

“आम्ही आमचा निर्णय जाहीर केलाय. ज्या कामगारांना तो निर्णय मंजूर असेल ते कामगार कामावर येतील. ज्यांना मंजूर नसेल त्यांना कडक कारवाईला सामोरं जावं लागेल. कामगारांनी कोणाची लिडरशीप स्वीकारावी हा त्यांचा प्रश्न आहे. फक्त मी त्यांना एकच सांगू इच्छितो, तुटेपर्यंत ताणू नये. एकदा तुटलं तर जोडणार नाही. कारवाई आता किती कामगार येतील त्यावर ठरवू. निलंबित झालेले कामगार उद्या आले तर त्यांचे निलंबन मागे घेऊ”, अशी भूमिका अनिल परब यांनी मांडली.

“विलीनीकरणाच्या बाबतीतील भूमिका स्पष्ट केली आहे. पगारवाढीच्या बाबतीत देखील सर्व लेखाजोखा मी कालच्या पत्रकार परिषदेत मांडलेला आहे. आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्याशी काल दिवसभर झालेल्या चर्चेच्या अंती आम्ही या सगळ्या गोष्टी मांडल्या. त्यामुळे आज त्यांनी सरकारच्यावतीने जे काही मांडलं गेलं ते कर्मचाऱ्यांना सांगून आपलं आंदोलन मागे घेतलं आहे”, असं परब म्हणाले.

Team Global News Marathi: