आम्ही बंड नव्हे तर उठाव केलाय : गुलाबराव पाटील गरजले !

आम्ही बंड नव्हे तर उठाव केलाय : गुलाबराव पाटील गरजले !

ग्लोबल न्यूज वृत्तसेवा | ”शिवसेनेला पध्दतशीरपणे उध्वस्त करण्याचे कारस्थान होत असतांना आमच्या आमदारांचे कुणीच काहीही ऐकून घेत नव्हते. यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही वेगळा निर्णय घेतला. आम्ही बंड नव्हे तर उठाव केलाय !’ अशा शब्दांमध्ये आज माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत जोरदार भाषण केले. अतिशय तडाखेबंद अशा भाषणाने गुलाबवराव पाटलांनी आज सभागृह गाजवल्याचे दिसून आले.

माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी आज विश्‍वासदर्शक ठरावावर अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषण केले. ते म्हणाले की, ”बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन आम्ही शिवसेनेत कार्यरत झालो. १९९५ साली शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांनी मला जिल्हाप्रमुख केले. तेव्हा आमचे थांबण्याचे ठिकाण हे ठाण्यातील एकनाथ शिंदे यांचे कार्यालय असायचे. तिथे आम्हाला दिलासा मिळायचा. आम्ही बंड नव्हे तर उठाव केलाय. आम्ही हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत होऊ नये म्हणून आम्ही हे पाऊल उचचले. आज आमच्यावर टपरी चालवत होते म्हणून टीका होत. मात्र धिरूभाई देखील पेट्रोल पंपावर कामाला होते. आमचे मुख्यमंत्री रिक्षा चालवत होते हेदेखील खरे आहे. अनेक सर्वसामान्यांना बाळासाहेबांनी आयुष्य घडविले.”

आ. गुलाबराव पाटील म्हणाले की, ”अजितदादा म्हणाले की, शिवसेना सोडून आलेले निवडून येत नाहीत. मात्र दादा आम्ही शिवसेना सोडले नाहीत. यामुळे दादा आमच्या निवडून येण्याची चिंता करू नका” असा टोला त्यांनी मारला. ५५ मधून ४० आमदार कसे फुटतात यावर विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. मात्र सर्व आमदार त्यांना दु:ख सांगायला जायचे. आम्हाला भेट मिळत नाही. आम्ही सहज आमदार झालेले नाहीत. आम्ही अनेक गुन्हे अंगावर घेतलेत. यातून आम्ही आमदार आणि मंत्री बनलो. गेल्या दोन वर्षात अनेक बाबी घडल्या. कोरोनाच्या काळात शिंदे साहेबांनी खूप मदत केली. तिकडे आमदारांना भेटायला वेळ नाही. मात्र इकडे दिलासा मिळाला. आमच्यावर गद्दार म्हणून आरोप करण्यात आलेत. खालच्या भाषेत टीका करण्यात आली. आम्ही चार लाख लोकांमधून निवडून आलो आहोत. मनगटात जोर असल्यावरच कुणीही निवडून येतो. आमचा मुख्यमंत्री असतांनाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही चौथ्या क्रमांकावर गेलो.

गुलाबराव पाटील म्हणाले की, फुट पडल्यानंतर २० आमदार मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलो. यावर तुम्हाला जायचे तर तुम्ही सुध्दा जा असे सांगण्यात आले. बाळासाहेब हे महापुरूष असून त्यावर कुणाचाही एकाचा हक्क नाही. आम्ही अनेकदा आमदारांच्या नाराज्या सांगत होतो. मात्र आमचे फोन सुध्दा उचलले जात नव्हते. अजितदादा यांच्यासारखे नेते कुणालाही उपलब्ध होत असले तरी आमच्याकडे तसे नव्हते. आमच्यावर शिवराळ भाषा वापरली गेली. एकनाथ शिंदे साहेब सत्तेचे भुकेले नाहीत. त्यांची दोन मुले गेल्यानंतर धर्मवीर आनंद दिघे यांनी त्यांना अनाथांचा नाथ बनण्याचे सांगितले. आज त्यांचा आणि बाळासाहेबांचा आत्मा आज त्यांना आशीर्वाद मिळत असेल असे गुलाबराव पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, चांडाळ चौकडीने आमच्या उध्दव साहेबांना चुकीच्या मार्गावर नेले. त्यांनी या चौकडीला लांब करण्याची गरज आहे. तुमची माणसे तुमच्यापासून दूर गेलेली नाहीत, तर त्यांना दूर लोटले गेले आहे. आज आम्ही खूप मोठी रिस्क घेऊन बाहेर पडलो आहोत. एकाच वेळी विरोधकांसह सहकार्‍यांचाही सामना करावा लागणार आहे. एकनाथ शिंदे यांचा अपवाद वगळता कुणीही जळगाव जिल्ह्यात आले नाही. दुसर्‍या पक्षांचे नेते येत असतांना शिवसेनेचे नेते महाराष्ट्रात फिरले नाहीत. यामुळे आम्ही बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. मोदीजी आणि फडणवीस यांच्यामुळे ५० आमदार असतांनाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. शिवसेना प्रमुखांचे स्वप्न साकार करत असतांना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रलंबीत प्रश्‍नांना गती द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी बहुमत विश्‍वासदर्शक प्रस्ताव पारीत झाल्याबद्दल कौतुक केले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: