वरळीतील खरे शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्याच पाठीशी, शिंदे गटातील पक्षप्रवेश फसवा

 

दसरा मेळाव्यापूर्वीच शिवसेनेच्या दोन गटात मोठा संघर्ष बघायला मिळत आहे. एकीकडे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन गटामध्ये खरी शिवसेना कुणाची यावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. आणि अशातच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत काल मोठे राजकीय नाट्य बघायला मिळाले.

वरळीतील जवळपास ५०० शिवसैनिक शिंदे गटात सामील झाल्याचे बघायला मिळाले. मात्र सायंकाळी याच शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांसह आमदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वात थेट मातोश्री गाठून आपण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. दिवसभराच्या राजकीय नाट्यानंतर सायंकाळी वरळीच्या कोळीवाड्यातील सगळे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, नगरसेवक, उपविभाग प्रमुख शिवसैनिकांना घेऊन मातोश्रीवर पोहचले. मातोश्री येथे जाऊन शिवसेनाप्रमुखांच्या आसनासमोर नतमस्तक होऊन एकनिष्ठतेची शपथ घेतली व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.

वरळीतील शिवसैनिक शिंदे गटात गेले ही खोटी बातमी असल्याचा दावा या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच ते शिवसैनिक नव्हतेच, तर सामान्य नागरिक होते. ते कोस्टल रोडच्या रखडलेल्या कामाला पूर्ण करण्याच्या मागणीसंदर्भात निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला. कुठेतरी निष्ठा मनामध्ये शांत बसू देत नव्हती म्हणून सगळे पदाधिकारी तात्काळ मातोश्रीवर पोहचले. जे गेले असतील ते दोन चार दिवसात स्वतः येऊन खुलासा करतील.

महाराष्ट्र एका बाजूला आणि आम्ही वरळीकर एका बाजूला असं चित्र ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठी एक मोठा कट रचला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी केला.

Team Global News Marathi: