विसर्जन मिरवणुकीत वसंत मोरेंचा चंद्रमुखीच्या चंदा गाण्यावर (तात्यांचा) ट्रॅक्टरवर भन्नाट डान्स

 

१० दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुका आणखी सुरु आहेत तर पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतीचं विसर्जन संपन्न झालंय. गेली २ वर्ष कोरोनाच्या सावटामुळे आगमन मिरवणुका आणि विसर्जन मिरवणुकांचा थाट पाहायला मिळालेला नव्हता. यंदा मात्र गणेश भक्तांनी दोन्ही वर्षांची कसर भरुन काढली. कुठे ढोल ताशांचा गजर तर कुठे डीजेच्या तालावर तरुणाई बेभान होऊन थिरकली. पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे आपल्या रावडी अंदाजासाठी ओळखले जातात. त्यांनीही विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या तालावर ठेका धरला. हृदयी वसंत फुलताना, या गाण्यावर भन्नाट डान्स केला.

पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचं रात्री विसर्जन झालेलं असलं तरी गेल्या २२ तासांपासून श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू आहे. जवळपास १४ तास डीजे वाजल्यानंतर रात्री १२ च्या ठोक्याला बरोबर डीजे बंद करण्याचे आदेश असल्याने बेभान होऊन थिरकणाऱ्या तरुणांचा हिरमोड झाला. पण तरुणाईने लय कायम राखत ढोल ताशांवरही नाच केला. विसर्जन मिरवणूक पुढे सरकत होती, तसतसा तरुणाईचा उत्साह देखील वाढत होता. आज सकाळी ६ चा ठोका पडताच सार्वजनिक मिरवणुकीतील डॉल्बीचा दणदणाट पुन्हा सुरु झाल्याने तरुणांमध्ये पुन्हा उत्साह संचारला. अलका टॉकीज चौकात हजारो गणेश भक्तांनी डॉल्बीवर ठेका धरला.

मनसेचे नेते वसंत मोरे यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवून गणेश भक्तांच्या साथीने त्यांच्या सुरात सूर मिसळून भन्नाट डान्स केला. पारंपारिक वाद्यांवर ते थिरकलेच पण उडत्या चालीच्या गाण्यांवरही त्यांनी मनमुराद नृत्याचा आनंद लुटला. आपल्या मोकळ्या-ढाकळ्या स्वभावासाठी आणि रोखठोक वागण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या तात्यांच्या डान्सचा अंदाज सगळ्यांनाच भावला. कालच्या मिरवणुकीतल्या डान्सचे व्हिडीओ वसंत मोरे यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेत.

Team Global News Marathi: