विरोधकांनी ‘साहेबां’च्या खेळीत फसू नये, प्रशांत किशोर यांचा मोदींवर हल्लाबोल

 

नवी दिल्ली | उत्तर प्रदेश आणि गोवा विधासभेच्या विजयानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचे स्वप्न पाहणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शुक्रवारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी जोरदार हल्ला चढवला. देशासाठीची खरी लढाई २०२४ मध्ये लढली जाईल, कुठल्या एका राज्याच्या निवडणुकीत नाही, असा टोला मोदींना लगावतानाच विरोधी पक्षांनी ‘साहेबां’च्या खेळीत फसू नये, असेही प्रशांत किशोर यांनी नमूद केले.

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारल्यानंतर पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी यूपीच्या निकालाने २०२४ च्या निवडणुकीची ‘ब्लू प्रिंट’ काढली असून लोकसभेचा निकाल ठरवल्याचा दावा केला. मोदींच्या त्या विधानाचा प्रशांत किशोर यांनी शुक्रवारी समाचार घेतला.

देशासाठीची लढाई 2024 च्या लोकसभा निवडणुकीत लढली जाईल. त्याच वेळी फैसला येईल. देशासाठीची लढाई कुठल्याही एका राज्याच्या विधानसभा निवडणुकीत लढली जाणार नाही. ‘साहेबां’नाही हे ठाऊक आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या माध्यमातून विरोधकांविरुद्ध मानसिकता तयार करण्याची चाल खेळली जात आहे, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला. ‘साहेबां’च्या खोटय़ा खेळीत कुणी फसू नये आणि याचा भागही बनू नये, असा सावधगिरीचा सल्ला त्यांनी विरोधी पक्षांना दिला आहे.

Team Global News Marathi: