विधानसभा अधिवेशनापूर्वी होणार मंत्रिमंडळ विस्तार, संदीपान भुमरे यांचे सूचक विधान

 

सध्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्री मंडळ विस्तारावरून राजकारण तापलेले असताना यावर आता शहानंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांनी सूचक विधान केले आहे. विधानसभा अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून आमच्यात कोणीही नाराज नसल्याचा दावा राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी केला. भुमरे यांनी माध्यमांशी बोलताना हे विधान केले होते.

आज पंढरपूर येथे खाजगी दौऱ्यानिमित्त आले असता भुमरे एबीपी माझाशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासाठी मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याचे आरोप चुकीचे असून असे असते तर पहिल्यांदाच मंत्रिमंडळ विस्तार झाला नसता असे त्यांनी सांगितले. मंत्रिपद हे सर्वांनाच पाहिजे असते. मात्र ते सर्वांना मिळू शकत नसते हे वास्तव आहे. मात्र मंत्रिपदासाठी शिंदे गटात कोणीही नाराज नसल्याचा पुनरुच्चार भुमरे यांनी केला.

विधानपरिषद निवडणूक निकालाचा कोणताही फटका आम्हाला बसला नसून आमची ताकद काय हे 2024 मध्ये पुन्हा सत्तेत येऊन आम्ही दाखवून देणार असल्याचे भुमरे यांनी सांगितले. संभाजीनगर येथील लोकसभेची जागा ही बाळासाहेबांच्या शिवसेनेची असून येथे कोणीही दावा केला तरी ही जागा शिंदे गट लढवणार आणि जिंकणार असे भुमरे यांनी सांगितले. पक्षाने आदेश दिला तर संभाजीनगर लोकसभा लढवण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

याआधी मागील महिन्यातच औरंगाबादचे खासदार कोण होणार यावरुन इम्तियाज जलील आणि संदीपान भुमरे यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळला होता.. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेचाच खासदार होईल, असा दावा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केला आहे

Team Global News Marathi: