विधान परिषदेसाठी खडसे, मुंडे, अहिर यांच्या नावांची जोरदार चर्चा !

 

राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच विधान परिषदेच्या दहा जागांसाठीची निवडणूकही तोंडावर आली असल्याने सर्वपक्षीय नेते मंडळींची खलबते सुरू आहेत. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, सचिन अहीर, आदी नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला निवडणूक होणार आहे.

तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे; तर, १० तारखेला राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे एकीकडे राज्यसभेची मोर्चेबांधणी सुरू असली तरी विधान परिषदेसाठीही खलबते सुरू आहेत. या १० जागांसाठी कोणत्या पक्षातून कोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

शिवसेनेकडून मुंबईतील सचिन अहीर आणि नंदुरबार येथील आमशा पाडवी यांची नावे चर्चेत आली आहेत. मात्र, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे पक्षातील महत्त्व आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी जवळीक पाहता, त्यांना पुन्हा एकदा संधी देत मंत्रिपद कायम राखले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावेळी ‘योग्य ती काळजी घेऊ’, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले होते.

विधान परिषदेच्या अनुषंगाने अलीकडेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी अहीर यांच्याशी दीर्घ चर्चा केल्याचे समजते. त्यामुळे सध्या अहीर यांच्याऐवजी देसाई कायम राहणार असल्याचाही तर्क लढविला जात आहे. तर, नंदुरबार-धुळे पट्ट्यात शिवसेना वाढविण्याच्या दृष्टीने आमशा पाडवी यांना संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. वरिष्ठ नेत्यांकडून पाडवी यांना फोनही गेल्याचे कळते.

Team Global News Marathi: