‘अडीच वर्ष राहिलंय, त्यांना शेवटी आपल्याकडेच यायचंय’ फुटण्याची भाषा करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना इशारा

 

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शीतयुद्ध पेटलेआहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जूनला मतदान होणार आहे. सहा जागांसाठीच्या या निवडणुकीत सहा उमेदवार असल्याने चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारला समाजवादी पक्षाचा पाठींबा आहे.

मात्र दुसरीकडे पण राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सपा नेते अबू आझमी हे महाविकास आघाडीवर टीका करताना दिसत आहेत. याशिवाय बहुजन विकास आघाडीकडूनही महाविकास आघाडीला पाठींबा देण्याबाबतची भूमिका स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना मोठा इशारा दिला आहे. “अपक्ष आणि इतर लहान पक्षांची नाराजी आपण दूर करतोय. पण जे फुटण्याची भाषा करत आहेत त्यांनीही हे लक्षात ठेवावं. पुढील अडीच वर्ष आपलंच सरकार आहे.

त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील कामं करण्यासाठी त्यांना आपल्याकडेच यायचं आहे”, असं सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलच्या सभागृहात ते बोलत होते. ट्रायडेंट हॉटेलमध्ये आज महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते.

“केंद्रीय यंत्रणा ED, CBI, IT यांना घाबरू नका. आपल्यापैकी बहुतेकांना अनेक नोटीस आल्या आहेत. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात भाजपवाले हेच करत आहेत. पण त्यांच्या हाती काहीच लागत नाही. भाजपची ही रणनीती फेल ठरलीय. ते घाबरवण्या पलिकडे काहीच करणार नाहीत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. राज्यसभेच्या चारही जागा निवडून आणायच्या आहेत. आपलं ऐक्य दाखवा”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांना केलं आहे.

Team Global News Marathi: