व्हिप झुगारून 39 आमदारांचे मतदान म्हणजे लोकशाहीची पायमल्ली -सुनील प्रभू

 

व्हिप झुगारून 39 आमदारांनी केलेले मतदान म्हणजे लोकशाहीची पायमल्ली केली असल्याचा घणाघात शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी केला. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेतील बंडाळी आणखी ठळकपणे दिसून आली. शिवसेनेच्या 39 बंडखोरांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांच्याविरोधात मतदान केले. शिवसेनेच्या 39 आमदारांनी व्हिप झुगारून मतदान केले. त्यामुळे आपण (राहुल नार्वेकर) विधानसभेच्या अध्यक्षपदी किती काळ असाल याबाबत राज्यातील 13 कोटी जनतेला शंका आहे, असेही सुनील प्रभू यांनी म्हटले.

आज विधानसभा अध्यक्षपदाची निवड पार पडली. भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव केला. त्यानंतर नवनिवार्चित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावावर बोलताना शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी म्हटले की, विधानसभेच्या अध्यक्षपदी तरुण सदस्याची निवड झाली याचा आनंद वाटत आहे. आपण कधीकाळी शिवसेनेत नंतर राष्ट्रवादी गेलात. त्यानंतर भाजपात गेलात. मागील 15 दिवसांमध्ये सत्तांतराच्या वातावरणात राहुल नार्वेकर कायदा मंत्री होतील असे वाटलं होतं.

मात्र नशिबाचे फेरे कधीही फिरू शकतात. ज्यांना मुख्यमंत्री पाहत होतो त्यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. ज्यांना कायदा मंत्री म्हणून पाहत होतो त्यांना विधानसभा अध्यक्ष व्हावे लागले असे प्रभू यांनी म्हटले. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असतील असे वाटलं होतं. मात्र, आमचं दु:ख विसरून देवेंद्र यांचं दु:ख मित्र म्हणून मोठं वाटलं असल्याचेही प्रभू यांनी म्हटले.

 

Team Global News Marathi: