“वरातीमागून घोडे नाचवण्याला काहीच अर्थ नाही, आदित्य ठाकरेंचे दौरे निष्फळ होतील”

 

मुंबई | एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेमध्ये सुरु असलेली गळती आता थांबता थांबत नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना वाचवण्याचा मोठा पेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे. यातच आता ठाकरे पिता-पुत्र चांगलेच सक्रीय झाले असून, राज्यभरात दौरे काढले जात आहेत. यावरून भारतीय जनता पक्षाने टीका केली आहे.

भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावर निशाणा साधला आहे. वरातीमागून घोडे नाचवण्याला काहीच अर्थ नाही. ज्यावेळेस आदित्य ठाकरे मंत्री होते व त्यांचे वडील मुख्यमंत्री होते त्यावेळेस जर आपण कोविड सारख्या भीषण संकटात सामान्य जनतेची, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची सुख-दु:ख व शिवसैनिकांच्या व्यथा समजून घेतल्या असत्या तर काही उपयोग झाला असता. परंतु आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंचे दौरे निष्फळ होतील, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी शिवसेना सोडावी असे भाजपमधल्या कुठल्याही कार्यकर्त्याला, नेत्याला वाटत नाही. उलट त्यांच शिवसेनेत राहणचं योग्य आहे. ज्यावेळी राऊतांप्रमाणेच आनंदराव अडसूळ साहेबांवर ईडीची कारवाई झाली, तेव्हा एक ज्येष्ठ नेता विवंचनेत होता. त्यावेळेस त्यांची भेट घ्यावी असे उद्धव ठाकरेंना वाटले नाही.

तसेच यशवंत जाधव स्थायी समितीचे ३-४ वर्ष अध्यक्ष झाल्यानंतर ज्यांनी मातोश्रीचेच हित जपले त्यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यावर साधा एक फोनही आपण करु शकला नाहीत, अशी खंत व व्यथा त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी व्यक्त केली होती. मग आता एकदम संजय राऊतांचाच कळवळा का याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यायला हवे, या शब्दांत प्रवीण दरेकर यांनी जोरदार हल्लाबोल केला.

Team Global News Marathi: